पालिकेच्या शाळांना वृक्षांचे सूतक

By Admin | Updated: July 14, 2014 01:01 IST2014-07-14T01:01:28+5:302014-07-14T01:01:28+5:30

राज्यात सर्वत्र पर्यावरण ग्राम समृद्धी योजनेंतर्गत

Tree Shops to Municipal Schools | पालिकेच्या शाळांना वृक्षांचे सूतक

पालिकेच्या शाळांना वृक्षांचे सूतक

वृक्षारोपणासाठी विशेष तरतूद : नावापुरतेच केले जाते वृक्षारोपण
कपिल केकत गोंदिया

राज्यात सर्वत्र पर्यावरण ग्राम समृद्धी योजनेंतर्गत पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी वृक्ष लागवड मोहीम हाती घेऊन त्यांना वाढविण्याचा संकल्प केला जात आहे. मात्र येथील नगर परिषदेच्या शाळा परिसरात वृक्षचं नसल्याचे चित्र आहेत. शाळांना असलेले मोठाले मैदान झाडांविना ओस पडलेले आहेत. यावरून पालिकेच्या शाळांना वृक्षांचे सूतक असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
नगर परिषदेच्या शाळा शिक्षणाच्या क्षेत्रात कितपत मागासलेल्या आहेत हे शहरवासीयांना चांगलेच ठाऊक आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात झेंडे न गाडणाऱ्या पालिकेच्या शाळा मात्र अन्य क्षेत्रातही मागासलेल्याच आहेत. अर्थात याला विद्यार्थी कारणीभूत नसून नगर परिषद व शाळा प्रशासनाचा कामचूकारपणा कारणीभूत आहे. आज घडीला वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन अत्यावश्यक झाले आहे. यासाठी सामाजीक संस्था पुढाकार घेत वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेऊन यात हातभार लावत आहेत. तर बालपणापासूनच विद्यार्थ्यांना वृक्ष व त्यांचे मानवी जीवनात महत्व याबाबत माहिती तसे संस्कार पडावे हा उद्देश ठेऊनच खाजगी शाळा व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेतले जातात. कित्येक शाळांमध्ये तर विद्यार्थी व शिक्षक मेहनत घेऊन बाग फुलवित असल्याचे उदाहरण सुद्धा जिल्ह्यात बघावयास मिळते. एवढा हा आटापिटा फक्त वृक्ष लागवडीसाठी केला जात आहे. शासन सुद्धा आपल्या योजनांमध्ये शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सामावून घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
मात्र पालिकेच्या कित्येक शाळांमध्ये झाड काय झाडाचे पानही बघावयास मिळत नाही. शहरातील मरारटोली, सिव्हील लाईन्स, छोटा गोंदिया येथील शाळांमध्ये बघावे तर या शाळा वाळवंटात असल्यासारखे वाटते. विशेष म्हणजे शहरात नगर परिषदेच्या सर्वच शाळांना मोठाले मैदान लाभलेले आहेत. कित्येक शाळांतील या मैदानात तर लग्न सोहळे, आनंद मेला, क्रिडा स्पर्धांसारखे आयोजन होत असतात. पालिकेला त्यातून पैसा कमाविण्याचा भान आहे. मात्र या शाळांच्या मैदानात वृक्षारोपण करून पर्यावरणाला हातभार लावणे मात्र पालिकेला उमगत नसल्याचे चित्र आहे. हेच कारण आहे की, पालिकेच्या शाळांच्या मैदानातून झाडे नदारद आहेत.
शिक्षणाच्या क्षेत्रात तर पालिकेचे गुरूजी किती गंभीर आहेत हे निकालातून दिसून आले. किमान शिक्षणात नाही तर अन्य कार्यक्रमांमध्ये तरी गुरूजींनी झेंडे गाडायला हवे, अशी अपेक्षा शहरवासी बाळगून आहेत. शहरातील नगर परिषदेच्या शाळांकडून वृक्षारोपण कार्यक्रम घेतल्याच्या बातम्या छापवून घेतल्या जातात. भाषणातून शिक्षक वृक्षारोपणावर मोठाले भाषण देऊन मोकळे होतात. त्यानंतर मात्र लावण्यात आलेल्या रोपट्यांची निगा राखण्याचे भान कुणालाही राहत नाही.
परिणामी लावलेली रोपटी जागच्या जागी मरण पावतात. तर खणण्यात आलेल्या त्याच खड्यांत पुढील वर्षी वृक्षारोपण केले जात असल्याचा प्रकार सुरू असल्यासारखे वाटते. हेच कारण आहे की, शहरातील अर्ध्याहून अधिक शाळांत वृक्षांचे नामोनिशाण नाही.
एकंदरीत पालिकेच्या शाळांना जणू वृक्षांचे सुतक आहे असा प्रकार दिसून येतो.

 

Web Title: Tree Shops to Municipal Schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.