तालुक्यातील परिवहन समित्या कागदोपत्रीच
By Admin | Updated: July 31, 2014 00:07 IST2014-07-31T00:07:05+5:302014-07-31T00:07:05+5:30
तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शाळेचा प्रवास सुखरुप सुरक्षित व्हावा यासाठी शाळांमध्ये शालेय परिवहन समित्या स्थापन करण्याचे आदेश शासनाच्या सबंधित विभागाने दिले आहेत.

तालुक्यातील परिवहन समित्या कागदोपत्रीच
रावणवाडी : तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शाळेचा प्रवास सुखरुप सुरक्षित व्हावा यासाठी शाळांमध्ये शालेय परिवहन समित्या स्थापन करण्याचे आदेश शासनाच्या सबंधित विभागाने दिले आहेत. मात्र मोजक्या शाळांमध्ये या समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. उर्वरीत शाळांमध्ये समित्यांचा बोजवारा उडून त्या समित्या कागदोपत्रीच असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीमुळे शाळांचे दुर्लक्ष होताना दिसते.
विद्यार्थ्यांची ने-आण करताना होणाऱ्या अपघाताच्या घटना होऊ नयेत ते टाळता यावे म्हणून शाळांना परिवहन समिती गठित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र ग्रामीण भागातील शाळांकडून या आदेशाची पायमल्ली करण्यात आली आहे. ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या तसेच शहरातील बहुतांश विद्यार्थ्यांना खासगी प्रवासी वाहनांचा आसरा घ्यावा लागतो. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहन धारकांवर शालेय प्रशासनाचे नियंत्रण असावे. या उद्देशाने प्रत्येक शाळेत शालेय परिवहन समिती स्थापन करण्याचे आदेश सबंधीत विभागाचे आहेत. मात्र त्या आदेशाप्रमाणे बहुतांश शाळांमध्ये परिवहन समित्यांची स्थापना करण्यात आल्याचं नाहीत.
परिवहन समितीमध्ये शिक्षक, मुख्याध्यापक व पालकांचा समावेश असतो. मात्र शाळा प्रशासन व पालकांचे विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे खासगी शाळांच्या वाहनांमध्ये क्षमते पेक्षा जास्त विद्यार्थी कोंबून त्यांची वाहतूक केली जात आहे. वाहतुकीकरिता जी वाहने या कामासाठी वापरली जातात ती वाहनेच कालबाह्य झालेले असते आणि त्याच वाहनातून विद्यार्थ्यांची वाहतुक होत असल्यामुळे अपघात नेमका कोणत्यावेळी होईल म्हणता येत नाही.
करिता विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणाऱ्या पालकांनीही या गैरसोई बद्दल वेळोवेळी खबरदारी घेणे गरजेचे आहे. मात्र या प्रकाराकडे पालक वर्गाचेही दुर्लक्ष होत असल्याने वाहन धारकांना सुगीचे दिवस आले आहेत. पालकांनी आपले पाल्य ज्या वाहनातुन जातात त्यात विद्यार्थ्यांची संख्या, वाहनाची स्थिती, बसण्याची सोय, वाहनचालक व्यसनी तर नाही, त्याचा वाहन चालविण्याचा परवाना या बाबींची पडताळणी सतत केली तर विद्यार्थ्यांचा प्रवास सुखमय सुरक्षित होऊ शकतो. शालेय परिवहन समित्यांनी, विद्यार्थ्यांची ने-आण सुरक्षित होत आहे किंवा नाही, विद्यार्थ्यांना शालेय सुविधा पुरेशा पुरविण्यात येत आहेत की नाही, या सर्व बाबींवर लक्ष ठेऊन काळजी घेणे अत्यंत गरजेचे ठरत आहे. (वार्ताहर)