बँक ऑफ इंडियाच्या शाखेचे स्थानांतरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:28 IST2021-04-10T04:28:25+5:302021-04-10T04:28:25+5:30
केशोरी हे या परिसरातील मोठे गाव असून, येथील लोकसंख्या सहा हजारच्या जवळपास आहे. या ठिकाणी पोलीस स्टेशनसह राज्य राखीव ...

बँक ऑफ इंडियाच्या शाखेचे स्थानांतरण करा
केशोरी हे या परिसरातील मोठे गाव असून, येथील लोकसंख्या सहा हजारच्या जवळपास आहे. या ठिकाणी पोलीस स्टेशनसह राज्य राखीव पोलीस दलातील ४० कर्मचारी कार्यरत आहेत. या ठिकाणी अनेक शासकीय, निमशासकीय कार्यालये आणि शाळा-महाविद्यालय असून, केशोरी हे ठिकाण परिसरातील गावांचे प्रमुख बाजारपेठेचे ठिकाण आहे. परंतु येथे एकही राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा नसल्यामुळे येथील नागरिकांना जोखीम पत्करून तिबेट कॅम्प येथील युनियन बँक शाखेत जावे लागते. तिबेट कॅम्पच्या स्थानिक लोकांपेक्षा केशोरी येथील खातेधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अनेकदा तिबेट कॅम्प येथे नेट सुुविधा उपलब्ध नसल्यामुळे बँकेचे व्यवहार ठप्प राहतात. नेट सुविधाअभावी कोणतेही व्यवहार केले जात नाहीत, त्यामुळे खातेधारकांना परत यावे लागते. यामुळे खातेधारकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. या ठिकाणी राष्ट्रीयीकृत बँक नसल्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी अर्जुनी मोरगावला जाऊन राष्ट्रीयीकृत बँकेचे व्यवहार करावे लागतात. वेळ आणि आर्थिक भुर्दंड खातेधारकांना सहन करावा लागतो. येथे राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा स्थापन करण्यासाठी अनेकदा निवेदन अर्ज देण्यात आले आहेत; मात्र त्यादृष्टीने कुठलीही शासनाची हालचाल होताना दिसून येत नाही. लोकप्रतिनिधीदेखील याकडे लक्ष देत नाहीत. त्यांनी या मागणीकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.