निवडणुकीच्या चोख बंदोबस्तासाठी ७२४ पोलिसांना प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 06:00 IST2019-09-26T06:00:00+5:302019-09-26T06:00:11+5:30
विधानसभा निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने मंगळवारी (दि.२४) प्रेरणा सभागृह पोलीस मुख्यालय गोंदिया येथे पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी-कर्मचारी, गृहरक्षक दल यांच्याकरिता निवडणूक व्यवस्थापन व बंदोबस्त प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

निवडणुकीच्या चोख बंदोबस्तासाठी ७२४ पोलिसांना प्रशिक्षण
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील १०० टक्के प्रशिक्षण पूर्ण होईपर्यंत ई-लर्निंग मॉडयुल-२०१९ चे उपक्रम सुरू राहणार आहे. सदर प्रशिक्षणाकरिता प्रशिक्षक तसेच गोंदिया जिल्हा पोलीस दलातील ३५ अधिकारी व ९० पोलीस कर्मचारी आणि ५९९ गृहरक्षक दलाला हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. निवडणुकीच्या दरम्यान चोख बंदोबस्त ठेऊन कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी हे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
विधानसभा निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने मंगळवारी (दि.२४) प्रेरणा सभागृह पोलीस मुख्यालय गोंदिया येथे पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी-कर्मचारी, गृहरक्षक दल यांच्याकरिता निवडणूक व्यवस्थापन व बंदोबस्त प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणात आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९ मुक्त आणि नि:पक्षपातीपणे वातावरणात व्हाव्यात,ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुका आहेत, अशा ठिकाणी मनुष्यबळ तैनाती हा निवडणुकीचा महत्त्वाचा भाग असल्याने त्या अनुषंगाने निवडणूक आदर्श आचारसंहितेत कसे पालन व्हावे. आचार संहिता भंग करणाऱ्यांवर काय कारवाई करावी यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. निवडणुकीचा अनुषंगाने निवडणूक विषयी कायदे लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१, भारतीय दंड विधान १८६०, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३, महाराष्ट्रपोलीस अधिनियम १९५१, महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम १९९५, वेब कॉसटिंग, कॅमेरा व व्हिडीओ ग्राफी, एस.एम.एस. आदी तंत्रज्ञानाचा वापर, निवडणुकीसंबंधी परिपत्रके आणि मागील निवडणुकीचा केस स्टडीज या विषयावर महाराष्ट्र पोलीस अॅकेडमी, नाशिक येथील ईलेक्शन ई-लर्निंग मॉडयुल व तज्ञ व्यक्तिचे मार्गदर्शन व व्हिडीओ दाखविण्यात आले.
प्रशिक्षणात पोलीस उपअधीक्षक (मुख्य) सोनाली कदम, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक महिपालसिंग चांदा, पोलीस निरीक्षक राहुल शिरे, रंगनाथ धारबळे, रविंद्र करपटे यांनी मार्गदर्शन केले. सदर प्रशिक्षणात उपस्थित असलेले पोलीस अधिकारी हे आप-आपले पोलीस स्टेशन, सी-६० मधील अधिनिस्त पोलीस अधिकारी-कर्मचारी यांना नाशिक पोलीस अॅकेडमी येथील ईलेक्शन ई-लर्निंग मॉडयुल-२०१९ चे प्रशिक्षण देणार आहेत.
आदर्श आचारसंहितेचे होणार पालन
आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी पोलिसांनी भूमिका, निवडणूक बंदोबस्त यामध्ये निवडणुकीचा पूर्वकाळ मतदान दिवस बंदोबस्त, निवडणुकीच्या कालावधीत राजकीय पक्षांना देण्यात येणाऱ्या सुरक्षा व्यवस्था, मतमोजणी ठिकाणाचा बंदोबस्त, भरारी पथक, स्टॅटिक सर्वेलंस टिम यांची भूमिका, पोलीस अधिकारी-कर्मचारी यांनी निवडणूक काळात घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन करण्यात आले.