कुठेही गाडी लावा, नो प्रॉब्लेम!
By Admin | Updated: December 31, 2014 23:25 IST2014-12-31T23:25:35+5:302014-12-31T23:25:35+5:30
सध्या गोंदिया शहरात कोणीही यावे, कुठेही आणि कितीही वेळ गाडी उभी करावी, कोणी काही म्हणणार नाही. हे चित्र चक्क वर्दळीच्या मार्केट परिसरातही आता सर्रास पहायला मिळत आहे.

कुठेही गाडी लावा, नो प्रॉब्लेम!
अनियंत्रित वाहतूक व्यवस्था : छत्तीसगड-मध्य प्रदेशातील वाहनांचा शहरात धुमाकूळ
गोंदिया : सध्या गोंदिया शहरात कोणीही यावे, कुठेही आणि कितीही वेळ गाडी उभी करावी, कोणी काही म्हणणार नाही. हे चित्र चक्क वर्दळीच्या मार्केट परिसरातही आता सर्रास पहायला मिळत आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक नियंत्रण व्यवस्था किती अनियंत्रित झाली याचा प्रत्यय यातून येत आहे.
व्यापारी शहर असलेल्या गोंदियात वर्षातील बाराही महिने वर्दळ असते. त्यातल्या त्यात नेहरू चौक ते दुर्गा मंदिर आणि गांधी चौक ते श्री टॉकीज चौक या मुख्य बाजारपेठेत कायम विविध खरेदीदारांची गर्दी असते. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसाठी प्रसिद्ध असलेल्या गोंदियाच्या मार्केटमध्ये सर्वच प्रकारच्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी जिल्हाभरातूनच नाही तर लगतच्या इतर जिल्ह्यातूनही लोक येत असतात. यात लगतच्या छत्तीसगड आणि मध्यप्रदेश राज्यातील चारचाकी वाहनांचीही वर्दळ मार्केट परिसरात नेहमीच असते. आपल्या कारने आलेले सुखवस्तू घरातील लोक मार्केटमध्ये खरेदी करीत असताना कार मात्र वाटेल त्या ठिकाणी पार्क करताना दिसतात. त्यामुळे आधीच अरूंद असलेल्या मार्केटमधील रस्त्यांवर वाहतुकीस मोठा अडथळ निर्माण होतो. त्याचा त्रास सर्वांनाच सहन करावा लागतो. मात्र खोळंबलेली वाहतूक नियंत्रित करण्यासाठी किंवा रस्त्यात उभे असलेले वाहन हटविण्यासाठी कधीही वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी पुढे आलेले दिसत नाहीत.
स्टेशन रोड, गोरेलाल चौक, बजाज पुतळा, नेहरू चौक अशा वर्दळीच्या स्थळीही बिनधास्तपणे ‘सीजी’ (छत्तीसगड) आणि ‘एमपी’ (मध्यप्रदेश) पासिंगच्या कार ठिकठिकाणी पार्क केलेल्या दिसतात. पण वाहतूक नियंत्रण शाखेकडून त्यांच्यावर कोणतीही कारवाई का होत नाही हे न समजणारे कोडे आहे.
विशेष म्हणजे ‘भारत सरकार’ किंवा ‘महाराष्ट्र शासन सेवार्थ’ असे नमुद असलेल्या काही सरकारी सेवेतील गाड्याही अशा पद्धतीने बिनधास्तपणे रस्त्यावरच पार्क केलेल्या असतात. कधी त्यातून ‘साहेब’ खरेदीसाठी उतरतात तर अनेकदा साहेबांचे कुटुंबिय खरेदीसाठी येत असतात.
या सरकारी अधिकाऱ्यांच्या गाड्यांना कसे चलान करायचे असा प्रश्न वाहतूक नियंत्रक कर्मचाऱ्यांना पडत असल्यामुळेच तर ते सर्वच गाड्यांना कुठेही पार्क करण्याची मुभा देत नाही ना, असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. गोंदियातील कार पार्किंगचा हा प्रश्न निकाली काढण्यासाठी नगर पालिकेकडून पार्र्किंग प्लाझाची निर्मिती केली जाणार आहे. मात्र तो तयार होण्यास किती काळ लागेल याची शाश्वती नाही. (जिल्हा प्रतिनिधी)