शेतकऱ्याने चालविला हरभरा पिकावर ट्रॅक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 05:00 IST2020-04-07T05:00:00+5:302020-04-07T05:00:37+5:30
कोरोनामुळे सध्या सर्वत्र लॉकडाऊनची स्थिती असल्याने याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. लॉकडाऊनमुळे उत्पादीत केलेल्या शेतमालाची विक्री शेतकऱ्यांना करता येत नसल्याने तो तसाच जागेवर खराब होत आहे. तर अनेक शेतकऱ्यांवर तो फेकून देण्याची वेळ येत आहे. दोन दिवसांपूर्वीच अर्जुनी मोरेगाव तालुक्यातील एका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांने मागणी नसल्याने दोन क्विंटलपेक्षा अधिक वांगी फेकून दिली होती.

शेतकऱ्याने चालविला हरभरा पिकावर ट्रॅक्टर
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : यंदा रब्बी हंगामात अवकाळी पाऊस सातत्याने हजेरी लावत असल्याने याचा सर्वाधिक फटका गहू, हरभरा या पिकांना बसला. अवकाळी पावसामुुळे शेतांमध्ये पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात पिके नष्ट होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघणे कठीण झाले आहे. यामुळे त्रस्त झालेल्या तालुक्यातील डोंगरगाव खजरी येथील प्रल्हाद कोरे या शेतकऱ्यांने आपल्या पाच एकरातील हरभऱ्याच्या पिकावर ट्रॅक्टर फिरविल्याचा प्रकार सोमवारी (दि.६) उघडकीस आला.
कोरोनामुळे सध्या सर्वत्र लॉकडाऊनची स्थिती असल्याने याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. लॉकडाऊनमुळे उत्पादीत केलेल्या शेतमालाची विक्री शेतकऱ्यांना करता येत नसल्याने तो तसाच जागेवर खराब होत आहे. तर अनेक शेतकऱ्यांवर तो फेकून देण्याची वेळ येत आहे. दोन दिवसांपूर्वीच अर्जुनी मोरेगाव तालुक्यातील एका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांने मागणी नसल्याने दोन क्विंटलपेक्षा अधिक वांगी फेकून दिली होती. दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात लग्नसराई राहत असल्याने या कालावधीत वांग्यांची मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र यंदा कोरोनामुळे मागील पंधरा दिवसांपासून सर्वत्र लॉकडाऊन आहे. परिणामी अनेक नियोजित विवाह सोहळे सुध्दा रद्द करण्यात आले आहे. तर शेतमालाची वाहतूक करण्यासाठी साधने मिळत नसल्याने आणि ग्राहकांची मागणी कमी झाली असल्याने या सर्वांचा परिणाम शेतकऱ्यांवर होत आहे. त्यातच जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर यंदा सातत्याने नैसर्गिक संकट कोसळत असल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
दर आठ दिवसांनी अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने रब्बी हंगामातील पिकांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा या पिकांची शेती पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या पिकांच्या लागवडीसाठी केलेला खर्च सुध्दा भरुन निघण्याची शक्यता कमी असल्याने शेतकऱ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण आहे. यातूनच आलेल्या नैराश्यामुळे तालुक्यातील डोंगरगाव खजरी येथील प्रल्हाद कोरे या शेतकऱ्यांने आपल्या पाच एकरमधील हरभरा पिकांवर सोमवारी ट्रॅक्टरने नांगर फिरविला. कोरे यांनी पाच एकरमध्ये हरभरा पिकाची लागवड करण्यासाठी एक ते सव्वा लाख रुपये खर्च केले. मात्र अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पूर्ण पाच एकरातील हरभरा पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघणे कठीण असल्यानेच त्यांनी पाच एकरातील हरभरा पिकावर नांगर फिरविल्याचे सांगितले.
कोरे यांच्याप्रमाणेच तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची हीच स्थिती असून शासनाने अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.