गोंदियातही होणार पर्यटन महोत्सव
By Admin | Updated: January 26, 2016 02:31 IST2016-01-26T02:31:08+5:302016-01-26T02:31:08+5:30
जिल्ह्यात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांना येथील पर्यटनस्थळांची ओळख करून देण्यासाठी लवकरच

गोंदियातही होणार पर्यटन महोत्सव
गोंदिया : जिल्ह्यात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांना येथील पर्यटनस्थळांची ओळख करून देण्यासाठी लवकरच पर्यटन महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. त्यासाठी ५० लाखांच्या निधीचे नियोजनही केले जात असून सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले बडोले यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीची आढावा बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष उषाताई मेंढे, आमदार गोपालदास अग्रवाल, आ.विजय रहांगडाले, आ.संजय पुराम, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जि.प.मुख्य कार्यपालन अधिकारी डी.बी. गावडे, उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, पो.अधीक्षक मिना यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सर्वसाधारण योजना/अनुसूचित जाती उपयोजना/ आदिवासी उपयोजना (ओटीएसपी) सन २०१६-१७ च्या प्रारूप आराखड्याला मान्यता देण्यात आली. यात कमाल आर्थिक मर्यादेनुसार सर्वसाधारण योजनेत ८६ कोटी ५७ लाख, अनुसूचित जाती उपयोजनेत ३८ कोटी ६५ लाख, आदिवासी उपयोजनेत ५९ कोटी ५१ लाख, ओटीएसपी योजनेत ८ कोटी २० लाख ६२ हजार तर माडा योजनेत ७ कोटी ५८ लाख ८३ हजार रुपयांच्या प्रस्तावित नियतव्ययाला मंजुरी दिली.
या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना सन १०१५-१६ अंतर्गत सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजनेअंतर्गत ७ कोटी १८ लाखाच्या पुनर्विनियोजन प्रस्तावास मान्यता देण्यात आली.
यावेळी डिसेंबर २०१५ अखेर झालेल्या आर्थिक व भौतिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला. त्यात आतापर्यंत ४० टक्के निधी खर्च झाल्याचे दिसून आले. उर्वरित ६० टक्के निधी ३ महिन्यात खर्च करायचा असून त्यासाठी पालकमंत्र्यांनी निर्देश दिले.
आदिवासी उपयोजनेत सर्वाधिक ६१.७२ टक्के निधी खर्च झाला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
आरोग्य व पेयजलासाठी भरीव तरतूद
४या बैठकीत केंद्र पुरस्कृत योजनांकरिता शासनाने निर्देशित केल्यानुसार नियतव्यय प्रस्तावित करण्यात आले. मृद व जलसंधारणाकरिता मागील वर्षीपेक्षा जास्त तरतूद प्रस्तावित करण्यात आली. सर्वसाधारण योजनेअंतर्गत सार्वजनिक आरोग्याकरिता तसेच राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमाकरिता भरीव तरतूद करण्यात आली. अंगणवाडी बांधकामाकरिता प्राधान्य, उर्जा विकासाकरिता यंत्रणेच्या मागणीनुसार नियतव्यय प्रस्तावित, पर्यटन विकासात पुरेशी तरतूद, नाविन्यपूर्ण योजनांकरिता शासन निर्देशानुसार नियतव्यय प्रस्तावित करण्यात आले.
नियोजन समितीच्या सभेतील महत्त्वाचे निर्णय
४अत्यल्प व अल्पभूधारकांकडील कर्जवसुली करण्यात येवू नये.
४१४ व्या वित्त आयोगाच्या प्राप्त निधीतून अंगणवाडी दुरुस्तीची कामे प्राधान्याने घ्यावीत.
४जड वाहतुकीबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व परिवहन विभागाने संयुक्तरित्या कार्यवाही करावी.
४जलयुक्त शिवारमध्ये निवड केलेल्या गावातील नागरिकांनी सांगितलेली सर्व प्रकारची जलसंधारणाची कामे करावी.
४लघु पाटबंधारे, स्थानिक स्तरकडे पुरेसे कर्मचारी नसल्यामुळे जलसंधारणाची ० ते १०० हेक्टरपर्यंतची कामे जिल्हा परिषदेने करावी.
४आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेल्या लाखेवर प्रक्रिया करण्यासाठी प्रोसेसिंग युनिट तयार करावे.
४मांडोदेवी पर्यटन स्थळ, नागरा पर्यटन स्थळ, कचारगड पर्यटन स्थळ या ३ स्थळांना ‘ब’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देणेबाबत शिफारस करणे.
४गोंदिया जिल्ह्यातील पर्यटन स्थळ विकासासाठी पर्यटन प्रवास शिबिर आयोजित करुन त्यासाठी योग्य ठिकाणी स्थानिक जनतेची/कलाकारांची नृत्ये, त्यांचेमार्फत तयार करण्यात येणाऱ्या कलाकुसरीच्या वस्तु अशा वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी वेब स्थळावर आणणे.
पर्यटन जिल्हा म्हणून देणार ओळख
४गोंदिया जिल्ह्यातील पर्यटनाच्या ठिकाणांची ओळख जिल्ह्याबाहेरील लोकांना करून देणे गरजेचे आहे. त्यासाठीच पर्यटन महोत्सवाची कल्पना मांडण्यात आली. यात सर्व आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपये तसेच जिल्हा निधीतून पैसे घेऊन या महोत्सवासाठी ५० लाखांची तरतूद केली जाणार असल्याचे यावेळी पालकमंत्री बडोले यांनी सांगितले. या महोत्सवात पर्यटकांना वेगवेगळ्या पर्यटनस्थळी जाण्या-येण्यापासून लोककलांच्या सादरीकरणातून त्यांचे मनोरंजन करण्यापर्यंतची तरतूद केली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळी विविध सोयी उपलब्ध करून देऊन दोन वर्षात गोंदियाला पर्यटन जिल्हा म्हणून राज्यात ओळख दिली जाईल असे ना.बडोले म्हणाले.