‘बाघ’चे उन्हाळी नियोजन कोलमडले

By Admin | Updated: December 25, 2014 23:33 IST2014-12-25T23:33:26+5:302014-12-25T23:33:26+5:30

जिल्ह्यात रबी हंगामासाठी (उन्हाळी) धानाचा पेरा करताना यावर्षी शेतकऱ्यांना मोठी अडचण जाणार आहे. इटियाडोह प्रकल्पातून मिळणाऱ्या पाण्यासोबत आता बाघ प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या

The 'tiger' summer planning collapsed | ‘बाघ’चे उन्हाळी नियोजन कोलमडले

‘बाघ’चे उन्हाळी नियोजन कोलमडले

केवळ ९६१ हेक्टरला लाभ : गतवर्षीच्या तुलनेत सहापटीने घट
गोंदिया : जिल्ह्यात रबी हंगामासाठी (उन्हाळी) धानाचा पेरा करताना यावर्षी शेतकऱ्यांना मोठी अडचण जाणार आहे. इटियाडोह प्रकल्पातून मिळणाऱ्या पाण्यासोबत आता बाघ प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनाही यावर्षी सिंचनापासून वंचित राहावे लागणार आहे. केवळ ९६१ हेक्टरमध्ये रबी हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत हे नियोजन सहा पटींनी कमी आहे.
बाघ कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत यावर्षीच्या रबी हंगामासाठी पाणी वाटपाचे नियोजन करण्यात आले. त्यात सर्वाधिक गोंदिया तालुक्यात ४४२ हेक्टरला, आमगाव तालुक्यात २९८ हेक्टरला तर सालेकसा तालुक्यात २०६ हेक्टरला असे एकूण ९६१ हेक्टरला बाघ प्रकल्पाचे पाणी मिळणार आहे. गेल्यावर्षी याच बाघ प्रकल्पातून ६००० हेक्टर सिंचनाचे नियोजन करण्यात आले होते. प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त म्हणजे ७५४५ हेक्टरला सिंचन करण्यात आले. यावर्षी मात्र परिस्थिती अगदी विपरित आहे.
यावर्षी पावसाळा कमी झाल्यामुळे खरीप हंगामात पिकांसाठी पाणी सोडावे लागले. त्यामुळे आधीच पाण्याची पातळी कमी असताना जलसाठाही अपुरा झाला. त्यामुळे रबी हंगामासाठीचे नियोजन पार कोलमडून गेले. गतवर्षीच्या तुलनेत एकदम सहा पटीने सिंचन क्षेत्र कमी करावे लागले. गेल्यावर्षी १०८.७६ दलघमी जलसाठा होता. मात्र यावर्षी केवळ १७.४९ दलघमी जलसाठा उपलब्ध आहे.
शेतकऱ्यांनी उपलब्ध असलेले पाणी मिळविण्यासाठी निर्धारित मुदतीत पाणीपट्टी थकबाकीचा भरणा करावा, तसेच उन्हाळी हंगाम २०१४-१५ ची आगाऊ पाणीपट्टी रक्कम भरावी. तसेच सुरळीत ओलीत होण्याच्या दृष्टीने आपल्या शेतातील पाटचाऱ्या साफ, स्वच्छ व प्रवाहक्षम करून ठेवाव्या, तसेच पाण्याचा योग्य वापर करावा, अशा सूचना कार्यकारी अभियंता गोन्नाडे यांनी केल्या आहेत.
बाघ व्यवस्थापन शाखा सालेकसा, आमगाव आणि पुजारीटोला येथील विद्युत पंपधारकांसाठी दिलेल्या मंजूर क्षेत्राच्या अर्ध्या क्षेत्रात उन्हाळी धानपिक घेण्याची मंजुरी देण्यात आली आहे. मात्र कामठा व कालीमाटी शाखेतील पंपधारकांना या हंगामात सिंचनासाठी पाणी पुरवठा करण्यात येणार नाही, असे बाघ इटियाडोह प्रकल्प कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: The 'tiger' summer planning collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.