वाघ व्यवस्थापन निद्रावस्थेत
By Admin | Updated: March 18, 2015 01:04 IST2015-03-18T01:04:01+5:302015-03-18T01:04:01+5:30
आमगाव येथील बाघ व्यवस्थापन उपविभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या बेबंदशाहीमुळे कालव्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.

वाघ व्यवस्थापन निद्रावस्थेत
आमगाव : आमगाव येथील बाघ व्यवस्थापन उपविभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या बेबंदशाहीमुळे कालव्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. आमगाव-देवरी मार्गावरील राज्य मार्ग ओलांडून जाणाऱ्या कालव्यावर मोठे भगदाड पडल्याने अपघाताला आमंत्रण मिळत आहे. संबंधित विभागाने तक्रारींकडे पाठ फिरविल्यामुळे या मार्गावर अपघाताची शक्यता वाढली आहे.
वाघ इटियाडोह पाटबंधारे उपविभागीय कार्यालयात अनागोंदी कारभार सुरू आहे. प्रशासनाने हात वर केल्याने या विभागांतर्गत येणाऱ्या वाघ कालव्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. वाघ कालव्यांच्या जागेवर अगोदरच खासगी लोकांनी अतिक्रमण करून पक्के बांधकाम केले. तर अनेक व्यक्तींनी वाघ कालव्यातील जागेची विक्रीही केली आहे. त्यामुळे कालवे खासगी वापरात आले आहेत.
वाघ इटियाडोह पाटबंधारे विभागाच्या माध्यमाने वाघ कालव्यांचे योग्य व्यवस्थापन व्हावे, याकरिता शासनाकडून निधीची तरतूद करण्यात येते. सिंचन सुविधा नियोजनामुळे शेतकऱ्यांना या कालव्यांद्वारे होणारे सिंचन लाभाचे ठरले आहे. परंतु विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे वाघ कालवे संपुष्टात येत आहे. त्यामुळे भविष्यात वाघ कालव्यातून मिळणाऱ्या सिंचनाच्या पाण्यापासून शेतकऱ्यांना वंचित व्हावे लागणार आहे.
वाघ कालव्यांच्या व्यवस्थापनावर शासकीय निधी योग्यरीत्या हाताळण्यात येत नाही. वाघ कालवे दुरूस्तीअभावी जर्जर झालेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे राज्यमार्ग ओलांडून जाणारे कालवे खड्ड्यांत रुपांतरीत झाले आहेत. या खड्ड्यांमुळे राज्य मार्गावरील रस्ते अपघाताला आमंत्रण देत आहेत. परंतु कुंभकर्णी अवस्थेत असलेला विभाग याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे चित्र पुढे आहे. (शहर प्रतिनिधी)