वाघ प्रकल्पाचा कालीमाटी शाखेवर मोठा अन्याय

By Admin | Updated: December 27, 2014 22:53 IST2014-12-27T22:53:19+5:302014-12-27T22:53:19+5:30

येथील वाघ सिंचन व्यवस्थापन शाखेंतर्गत उन्हाळी हंगामाच्या नियोजनात भातपिकांसाठी पाणी मिळत नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी प्रशासनाविरूध्द एल्गार पुकारले आहे. वाघ प्रकल्पांतर्गत

Tiger Crop's biggest injustice to the Kalymati branch | वाघ प्रकल्पाचा कालीमाटी शाखेवर मोठा अन्याय

वाघ प्रकल्पाचा कालीमाटी शाखेवर मोठा अन्याय

एच.के. फुंडे - कालीमाटी
येथील वाघ सिंचन व्यवस्थापन शाखेंतर्गत उन्हाळी हंगामाच्या नियोजनात भातपिकांसाठी पाणी मिळत नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी प्रशासनाविरूध्द एल्गार पुकारले आहे. वाघ प्रकल्पांतर्गत कालीमाटी शाखेवर अन्याय करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
वाघ सिंचन व्यवस्थापन उपविभागांतर्गत कालवे सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली. त्यात सिंचनासाठी अल्पसाठा २३.३२ दलघमी आहे. आजमितीस २३.०० दलघमी पाणी असून गोंदिया उपविभाग ४८५ हेक्टर, आमगाव ४६१ हेक्टर क्षेत्रासाठी मंजूर करण्यात आले.
मागील वर्षी १०८ दलघमी पाणी ६ हजार हेक्टर शेतीसाठी पाणी देण्यात आले. पण यावर्षी प्रकल्पामध्ये अल्प प्रमाणात जलसाठा असल्याने उन्हाळी हंगामासाठी शेतकऱ्यांना धान उत्पादनापासून वंचित रहावे लागणार आहे, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.
कालीमाटी शाखेंतर्गत करंजी कालव्याला कार्तूली या गावासाठी ४३ हेक्टर पाणी मिळणार असून उर्वरित शेकडो गावातील शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे या क्षेत्रातील शेतकऱ्यांनी प्रशासनाविरुध्द एल्गार पुकारले आहे. कालीमाटी येथील वाघ सिंचन व्यवस्थापन शाखेंतर्गत मानेकसा, टेकरी, सुपलीपार, मोहगाव वितरिकेत कालीमाटी, मानेकसा, घाटटेमनी, गिरोला, मोहगाव, करंजी, नंगपुरा, बंजारीटोला, मुंडीपार, भोसा, बोदा, मोहरनटोला, ननसरी अशा शेकडो गावांना पाण्यापासून मुकावे लागणार आहे. उपविभाग गोंदियातर्फे फक्त कालीमाटी शाखेतील कार्तुली गावासाठी पाणी देण्यात येणार आहे. सदर नियोजन करताना या परिसरावर अन्याय झाल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
गोंदिया उपविभागांतर्गत शाखा कामठा येथे नवरगावकला भाग १- १३० हेक्टर, नवरगाव कला भाग २- १६२ हेक्टर, ईर्री कालवा १- १५० हेक्टर अशा एकूण ४८५ हेक्टर शेतीसाठी पाणी मिळणार आहे. यामुळे कालीमाटी शाखेवर दुजाभाव केला असून येथील शेतकऱ्यांवर अन्याय केलाचा आरोप पाणी वाटप सोसायटीच्या सदस्यांनी केला आहे.
गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा शाखेत झालिया कालव्यासाठी २० हेक्टर, लटोरीसाठी २० हेक्टर, बाह्मणी २० हेक्टर, बिंजली २० हेक्टर आणि विद्युत पंपासाठी ७९ हेक्टर अशा एकूण १५९ हेक्टर शेतीसाठी पाणी मंजूर करण्यात आले आहे. शाखा पुजारीटोलाकरिता सातगाव कालवा क्र. १-१०, सातगाव क्र. २-२० हेक्टर, पानगाव १० हेक्टर, विद्युत पंप १७ हेक्टर तसेच शाखा आमगाव रिसामा लघु कालवा २० हेक्टर, गणेशपूर २५ हेक्टर, पदमपूर ३० हेक्टर, आमगाव ३० हेक्टर, विद्युत पंप १४० हेक्टर असे एकूण २४५ हेक्टर पाणी उन्हाळी भात पिकांसाठी मंजूर करण्यात आले.
गोंदिया उपविभागातर्फे प्रत्येक शाखेतील बहुतेक कालव्यांना पाणी मिळणार आहे. पण कालीमाटी शाखेत कातुर्ली या गावातच पाणी देऊन इतर कालव्यांवर येणाऱ्या गावांना वंचित ठेवण्यात आले आहे. पाणी वाटपाच्या नियोजन समितीच्या बैठकीत या परिसरातील स्थानिक प्रतिनिधी नसल्याने सदर शाखेवरील अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचाही आरोप होत आहे.
एकीकडे पावसाळ्यात पाण्याच्या लहरीपणामुळे कालीमाटी परिसरात दुष्काळाची स्थिती निर्माण झाली, येथील शेतकरी कर्जाच्या कचाट्यात सापडले. त्यामुळे उन्हाळी हंगामात पाणी मिळेल व कर्जाची परतफेड करून आर्थिक व मानसिक स्थिती सुधारता येईल, अशी त्यांची अपेक्षा होती. पण शेतकऱ्यांच्या या आशेवर पाणी फिरल्याने ते हताश झाल्याचे दिसून येते.
पुन्हा नियोजन समितीची बैठक बोलवून कालीमाटी शाखेला अधिक कालव्यांना पाणी देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Web Title: Tiger Crop's biggest injustice to the Kalymati branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.