लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : थायरॉइडचे प्रमाण वाढले आहे. १० रुग्णांमधून जवळपास ७ महिलांमध्ये हा आजार दिसून येतो. मात्र, हा असाध्य आजार नाही. याचे वेळीच निदान व उपचार केल्यास निरोगी जीवन जगता येते. यामुळे घाबरू नका, उपचार घ्या, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.
थायरॉइड ही गळ्याच्या पुढच्या भागात स्थित फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी आहे. जी चयापचय, शारीरिक वाढ आणि ऊर्जेच्या पातळीसह विविध शारीरिक कार्ये नियंत्रित करणारे संप्रेरक (हार्मोन्स) तयार करते. थायरॉइडचे आजार सामान्य आहे. ते सौम्य ते जीवघेण्यापर्यंत असू शकतात. हा आजार पुरुष आणि महिला अशा दोघांनाही प्रभावित करतो. पुरुषांच्या तुलनेत महिलांना याची अधिक जोखीम असते. प्राथमिक थायरॉइड आजारांमध्ये हायपोथायरॉइडीझम, हायपरथायरॉइडीझम, कर्करोग, गलगंड थायरॉइड आणि थायरॉइडायटिसचा समावेश होतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
...तर हृदयाची लयबद्धता बिघडू शकते हायपरथायरॉइडीझम झाल्यास वजन कमी होणे, हृदयाचे ठोके वाढणे, सतत घाम येणे, चिडचिड, उष्णता, बेचैनी आणि थरथरण्यासारखी लक्षणे दिसतात. जर उपचार झाले नाही, तर हृदयाची लयबद्धता बिघडून ऑस्टियोपोरोसिस आणि थायरॉइडची गंभीर गुंतागुंत निर्माण करू शकते. ही एक जीवघेणी स्थिती असू शकते. त्यामुळे वेळीच काळजी घेणे गरजे असल्याचा सल्ला डॉक्टारांनी दिला आहे.
हायपोथायरॉइडीझमची ही आहेत लक्षणे
- गलगंड म्हणजे थायरॉइड ग्रंथीचा विस्तार. बहुतेकदा सौम्य असतो. मात्र, जर तो पुरेसा मोठा झाला तर श्वास घेण्यास किंवा गिळण्यास त्रास देऊ शकतो. गलगंडाच्या कारणावर आणि आकारावर उपचार अवलंबून असतो.
- थायरॉइडायटिस म्हणजे ज्यामुळे हायपरथायरॉइडीझम किंवा हायपोथायरॉइडीझम होऊ शकतो. लक्षणे बहुतेकदा इतर स्थितींसारखीच असतात.
- हायपोथायरॉइडीझमची लक्षणे सूक्ष्म असू शकतात. यात थकवा, वजन वाढणे, बद्धकोष्ठता, कोरडी त्वचा, केस पातळ होणे आणि नैराश्याचा समावेश होतो. गंभीर प्रकरणांमध्ये हृदयाच्या समस्या आणि मज्जातंतूंचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे याची लक्षणे दिसताच वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
थायरॉइड कर्करोगइतर प्रकारच्या कर्करोगाच्या तुलनेत थायरॉइड कर्करोग तुलनेने दुर्मीळ मानला जातो. थायरॉइड कर्करोगाच्या प्राथमिक लक्षणांमध्ये मानेमध्ये वेदनारहित गाठ, गिळण्यास त्रास आणि आवाजात कर्कशपणा जाणवतो. बहुतेक प्रकरणांमध्ये अल्ट्रासाऊंड इमेजिंग आणि बारीक सुईच्या बायोप्सीद्वारे याचे निदान केले जाते.