बीएसएनएलच्या सेवेचे तीन-तेरा

By Admin | Updated: July 17, 2015 01:21 IST2015-07-17T01:21:25+5:302015-07-17T01:21:25+5:30

तालुक्यातील बीएसएनएलची लॅडलाईन दूरध्वनी सेवा गेल्या एक महिन्यापासून विस्कळीत झाली आहे.

Three-thirds of BSNL's service | बीएसएनएलच्या सेवेचे तीन-तेरा

बीएसएनएलच्या सेवेचे तीन-तेरा

देवरी तालुका : विस्कळीत सेवेमुळे अनेक कामे रेंगाळली
देवरी : तालुक्यातील बीएसएनएलची लॅडलाईन दूरध्वनी सेवा गेल्या एक महिन्यापासून विस्कळीत झाली आहे. त्यामुळे अनेकांची कामे ठप्प पडली आहे. मात्र संबंधित अधिकारी वर्ग झोपेचे सोंग घेऊन मुग गिळून गप्प बसल्याने सामान्य नागरिक व व्यापाऱ्यांची ससेहोलपट होत आहे.
तालुक्यातील सुरू असणारी दूरध्वनी सेवा ही फक्त काही मर्यादित कालावधीसाठी सुरू असते. तसेच देवरी येथील एक्सचेंजकडे वारंवार तक्रारी करूनही संबंधित अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. तालुक्यात बीएसएनएलचे मोबाईल टॉवर पूर्ण क्षमतेने रेंज देत नाहीत. रेंज दारात असते मात्र रेंज घरात नसते, अशी येथील परिस्थिती आहे. त्यामुळे लॅडलाईनशिवाय पर्याय नसल्याने नागरिकांची एका रुपयात होणाऱ्या कामासाठी बरीच पायपीट करावी लागते. तसेच वेळ व पैशाचे नुकसानही सहन करावे लागते.
देवरी एक्सचेंज अंतर्गत येणाऱ्या शेकडो गावात एक दिवस चालू तर दहा दिवस बंद, अशी अवस्था असते. या त्रासापायी कित्येकांनी बीएसएनएलची सेवा बंद केली असून खासगी सेवा पत्करली आहे. देवरी एक्सचेंजमध्ये अपुरा कर्मचारी वर्ग असून एका अभियंत्यावर तालुक्याच्या कामाचा भार आहे.
स्पर्धेच्या युगात लॅडलाईन सेवा टिकवायची असेल तर येथील कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे ग्राहकांना सेवा पुरविणे गरजेचे आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात सहकारी बँका, ग्रामपंचायत, पतसंस्था, सरकारी कार्यालय तसेच व्यापारी लोकांकडे बीएसएनएलची सेवा वापरली जाते. मात्र गेले वर्षभर दूरध्वनी सेवा, फॅक्स, इंटरनेट आदी सुविधांचा बोजवारा उडाला आहे.
त्यामुळे ग्राहकांनी दाद मागायची तरी कुणाकडे? अशी विपरित परिस्थिती तालुक्यातील जनतेची झाली आहे. महिन्यातून जेवढे दिवस दूरसंचार सेवा बंद असते तेवढी रक्कम त्यांच्या बिलातून कपात करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Three-thirds of BSNL's service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.