सातपैकी तीनच वर्गखोल्या योग्य
By Admin | Updated: September 11, 2016 00:27 IST2016-09-11T00:27:52+5:302016-09-11T00:27:52+5:30
जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत येणाऱ्या दवनीवाडा केंद्रातील देऊटोला जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा संपूर्ण

सातपैकी तीनच वर्गखोल्या योग्य
मूलभूत सुविधांचा अभाव : भंगार खोलीत शिकवितात शिक्षक
परसवाडा : जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत येणाऱ्या दवनीवाडा केंद्रातील देऊटोला जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा संपूर्ण मोळकळीस आली असून जीर्णावस्थेत आहे. दरवाजे, खिडक्या, छत, फाटे सर्व भंगारासारखीच झाली आहेत. या इमारतीत वर्ग पहिली ते सातवीपर्यंत १२० विद्यार्थी शिक्षण घेतात. परंतु प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे या शाळेचे बारा वाजले आहे.
सदर शाळेतील केवळ दोन वर्गखोल्या मुख्याध्यापकाने आपल्या स्तरावर पाणी पडू नये व विद्यार्थ्यांना बसण्याची सोय व्हावी, यासाठी व्यवस्था केली आहे. कशी तरी शाळा टिकावी म्हणून शिक्षक दरवर्षी शाळेची दुरुस्ती करतात. परंतु शाळेच्या दुरवस्थेकडे शाळा समिती व लोकप्रतिनिधीसुद्धा सतत दुर्लक्षच करीत आहेत.
लोकप्रतिनिधींनी सदर शाळा चांगली टिकून राहावी म्हणून कधीही प्रयत्न केले नाही. मी फक्त जि.प. सदस्य, पं.स. सदस्य व सभागृहाच्या नेतागिरीचा तोरा सांगत राहिले. देशाच्या भविष्य असणाऱ्या ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजुरांचे मुलांचे जीव त्यामुळे धोक्यात आले आहे. एकीकडे जिल्हा परिषद विकासाचा मोठा उदोउदो करते. लाखो रुपये खर्च, डिजिटल शाळा, वाचन आनंद उपक्रमाचा उदो करते. शिक्षकांवर दबावतंत्राचा उपयोग करते. मात्र शाळेच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष करतात.
पडक्या व भंगारवस्थेत असलेल्या वर्गखोलीमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देतात. मग एखाद्यावेळी विद्यार्थ्यांच्या जीविताशी धोका झाला तर यासाठी जबाबदार कोण राहणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सदर शाळेचे संपूर्ण जीर्णोद्धार करून नवीन वर्गखोल्या उपलब्ध करुन सोयीसुविधा पुरविणे आवश्यक झाले आहे. अन्यथा सदर शाळेची संपूर्ण इमारतच कधी कोसळेल, याचा नेम नाही.
जीवितहानी व वित्तहानी होवू नये, यासाठी दक्षता बाळगून आधीच शालेय इमारत दुरूस्त करणे गरजेचे झाले आहे. (वार्ताहर)