सराईत गुन्हेगारांच्या टोळीतील तिघांना केले तडीपार; गोंदिया, भंडारा , गडचिरोली जिल्ह्यातून केले हद्दपार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 20:10 IST2025-05-26T20:10:14+5:302025-05-26T20:10:35+5:30
बिलाल अल्ताफ कुरेशी (२१), दीपक तुळशीराम गायधने (२२), सुजित त्रिलोकचंद तरजुले (४०) रा. नवेगावबांध, ता. अर्जुनी-मोरगाव अशी हद्दपार करण्यात आलेल्या गुन्हेगाराची नावे आहेत.

सराईत गुन्हेगारांच्या टोळीतील तिघांना केले तडीपार; गोंदिया, भंडारा , गडचिरोली जिल्ह्यातून केले हद्दपार
गोंदिया: गोमांश विक्री करणे, चोरी करणे, सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन धिंगाणा करणे, धमकी देणे, कत्तली करीता गोवंश जातीच्या जनावरांची वाहतूक करणे अशा विविध सदराखाली गुन्हे करणाऱ्या तीन गुन्हेगारांना पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ अन्वये हद्दपारची कारवाई केली आहे. त्या आरोपींना तीन महिन्याकरिता गोंदिया, भंडारा , गडचिरोली जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
बिलाल अल्ताफ कुरेशी (२१), दीपक तुळशीराम गायधने (२२), सुजित त्रिलोकचंद तरजुले (४०) रा. नवेगावबांध, ता. अर्जुनी-मोरगाव अशी हद्दपार करण्यात आलेल्या गुन्हेगाराची नावे आहेत.
नवेगावबांध हद्दीत राहणारे सराईत गुन्हेगारांच्या कृत्यांमुळे परीसरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली होती. त्यासाठी पोलीस निरीक्षक योगिता चाफले यांनी त्या आरोपींना गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्हा हद्दीतून तडीपार करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ अन्वये प्रस्ताव तयार करून उपविभागीय पोलीस अधिकारी, देवरी यांच्या मार्फतीने मंजुरीस्तव सादर केला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांनी विहीत मुदतीत सदर हद्दपार प्रस्तावाची प्राथमिक चौकशी पूर्ण करून तिन्ही गुन्हेगार टोळीला गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्हा हद्दीतून हद्दपार करण्याची शिफारस प्राधिकारी तथा पोलीस अधीक्षक यांना केली होती. या तिघांना २४ मे रोजी २०२५ रोजीच्या आदेशान्वये तडीपारची कारवाई केली.
यापूर्वीही ६ गुन्हेगारांना केले तडीपार
यापूर्वी सुध्दा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये तिरोडा परिसरात टोळी करून अवैध धंदे करणाऱ्या ६ सराईत धोकादायक गुन्हेगारांना गोंदिया जिल्ह्यातून दोन महिन्याकरिता तडीपार करण्यात आले आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पाेलीस अधिक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधिक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, पोलीस निरीक्षक योगिता चाफले यांच्या मार्गदर्शनात प्रतिबंधक सेल, स्थानिक गुन्हे शाखेचे महिला पोलीस उपनिरीक्षक वनिता सायकर, पोलीस हवालदार प्रकाश गायधने, दुर्गेश तिवारी, भास्कर जमदाळ, देवचंद सोनटक्के यांनी केली आहे.
अवैध बेकायदेशीर कृत्य करून दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांची गय केली जाणार नाही. अवैध कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांनी आपल्या अवैध कृत्यापासून परावृत्त होऊन ईतर रोजगाराकडे वळावे.
- गोरख भामरे, पोलीस अधिक्षक गोंदिया.