वणवा विझविताना तीन मजुरांचा होरपळून मृत्यू; २ गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:28 IST2021-04-10T04:28:34+5:302021-04-10T04:28:34+5:30
गोंदिया : नवेगावबांध - नागझिरा अभयारण्य व पिटेझरी वन परिक्षेत्रात गुरुवारी अज्ञात इसमाने आग लावली. या आगीने उग्र रूप ...

वणवा विझविताना तीन मजुरांचा होरपळून मृत्यू; २ गंभीर
गोंदिया : नवेगावबांध - नागझिरा अभयारण्य व पिटेझरी वन परिक्षेत्रात गुरुवारी अज्ञात इसमाने आग लावली. या आगीने उग्र रूप धारण केले होते. ही आग विझविताना हंगामी तीन वन मजुरांचा यात होरपळून मृत्यू झाला, तर दोन मजूर गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री (दि. ८) उशिरा उघडकीस आली.
राकेश युवराज मडावी (४०, रा. थाडेझरी), रेखचंद गोपीचंद राणे (४५, रा. धानोरी), सचिन अशोक श्रीरंगे (२७, रा. कोसमतोंडी) अशी मृत मजुरांची नावे आहे. तर जखमींमध्ये विजय तिजाब मरस्कोल्हे (४०, रा. थाडेझरी), राजू श्यामराव सयाम (३०, रा. बोळुंदा, जि. गोंदिया) यांचा समावेश आहे. त्यांना नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार नवेगावबांध - नागझिरा अभयारण्य व पिटेझरी वन परिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ९८, ९९, १००, ९७ मध्ये गुरुवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास आग लागली. ही आग विझविण्याचे काम ५० ते ६० वन कर्मचारी व हंगामी मजूर करीत होते. सायंकाळी ६ वाजेपर्यंत आग काही प्रमाणात आटोक्यात आली. मात्र, याच दरम्यान पुन्हा हवाधुंद सुरू झाल्याने वणवा वाढला. वणवा विझवत असताना आगीने चारही बाजूने वनमजुरांना वेढा घातला. हा परिसर पहाडीवर असल्याने वनमजुरांना कुठलीच हालचाल करता आली नाही. त्यामुळे मध्यभागी पाच ते सहा मजूर अडकले. यात तीन मजुरांचा होरपळून घटनास्थळीच, तर दोन मजूर गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. हे सर्व हंगामी वनमजूर म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे. हा सर्व घटनाक्रम गुरुवारी रात्रीपर्यंत सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान, या घटनेमुळे वन मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
.......
फायर ब्लोअरचा स्फोट झाल्याची माहिती
उन्हाळ्याच्या दिवसात तेंदूपत्ता आणि मोहफूल संकलन करण्यासाठी काही नागरिक जंगलात आग लावतात. याच आगीचे रूपांतर वणव्यात होेते. दरम्यान, गुरुवारी नवेगावबांध - नागझिरा व पिटेझरी वन परिक्षेत्रात यामुळेच आग लागली. आगीने मजुरांना चारही बाजूने घेरल्याने पाचही मजूर एका झाडावर चढले. दरम्यान झाडावर चढत असताना एका मजुराकडे असलेले फायर ब्लोअर खाली पडून त्याचा स्फोट झाल्याने आगीने उग्र रूप धारण केले. यामुळे या मजुरांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यासंदर्भात वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी यावर अधिक बोलणे टाळले.
........
घटनेची माहिती देणे टाळले
नागझिरा व पिटेझरी वन परिक्षेत्रात गुरुवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास वणवा लागला. त्यानंतर वणवा विझविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते; पण यात तीन वनमजुरांचा होरपळून मृत्यू झाल्याची बाब वन व वन्यजीव विभागाने पुढे येऊ दिली नाही. त्यानंतर शुक्रवारी (दि. ९) सकाळच्या सुमारास याची माहिती दिली.
............
मृतकाच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत देणार
जंगलातील वणवा विझविताना तीन मजुरांचा होरपळून मृत्यू झाला तर दोन मजूर गंभीर भाजले. मृतक मजुरांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये आणि नवेगावबांध -नागझिरा फाउंडेशनकडून प्रत्येकी १ लाख, आ. मनोहर चंद्रिकापुरे यांच्याकडून प्रत्येकी १ लाख आणि एनजीओकडून प्रत्येकी दाेन लाख रुपये अशा एकूण १० लाख रुपयांची आर्थिक मदत मृतकाच्या कुटुंबीयांना देण्यात येणार असल्याचे नवेगावबांध- नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक मनिकानंद रामानुजन यांनी सांगितले.