आठ गावांतील उन्हाळी पीक धोक्यात
By Admin | Updated: March 12, 2016 01:56 IST2016-03-12T01:56:02+5:302016-03-12T01:56:02+5:30
ज्या धापेवाडा सिंचन योजनेच्या माध्यमातून तिरोडा परिसरातील आठ गावातील उन्हाळी धान पिकांसाठी पाणी पुरवठा केला जातो, ...

आठ गावांतील उन्हाळी पीक धोक्यात
लाखोचे वीज बिल थकीत : धापेवाडा उपसा सिंचन योजनेची वीज कापली
तिरोडा : ज्या धापेवाडा सिंचन योजनेच्या माध्यमातून तिरोडा परिसरातील आठ गावातील उन्हाळी धान पिकांसाठी पाणी पुरवठा केला जातो, त्या धापेवाडा प्रकल्पाचा वीज पुरवठा मागील सात दिवसांपूर्वी वीज कंपनीने खंडित केला. वीज बिल भरले नसल्यामुळे वीज कंपनीने हे पाऊल उचलले. मात्र या कारवाईमुळे पिकांना होणारा पाणी पुरवठा बंद होऊन धानपीक वाळण्याच्या मार्गावर आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये धापेवाडा सिंचन प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांबद्दल कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे.
सततच्या नापिकीमुळे कर्जाच्या ओझ्याखाली शेतकरी भरडले जात आहेत. खरीप हंगामात फारसे उत्पन्न न झाल्याने त्यांची संपूर्ण आशा रबी व उन्हाळी धानपिकांवर होती. मात्र तिरोडा परिसरातील धापेवाडा सिंचन योजनेचे वीज कनेक्शन कापण्यात आल्याने शेतातील पीक वाळण्याच्या मार्गावर आले असून शेतकऱ्यांना पुन्हा नुकसानच सहन करावे लागेल, अशी चिन्हे दिसून येत आहेत.
तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा, चिरेखनी, बेलाटी खुर्द, मांडवी, मुंडीपार, बेलाटी बु., मरारटोला, पुजारीटोला या आठ गावांतील उन्हाळी धानपिके पाणी पुरवठा बंद पडल्याने वाळण्याच्या मार्गावर आली आहेत. सदर आठ गावांतील एक हजार ५०० हेक्टर शेतजमीन पाण्याअभावी कोरडी पडली आहे. मात्र विद्युत विभाग काहीही ऐकायला तयार नाही, अशी स्थिती आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धापेवाडा उपसा सिंचन योजनेवर डिसेंबर महिन्यात ३० लाखांचे वीज बिल होते. यापैकी २५ लाख रूपये भरण्यात आले. जानेवारी महिन्यात नऊ लाखांच्या जवळपास वीज बिल बाकी आहे.
दरवर्षी शेतकऱ्यांकडून १०० टक्के वसुली केली जाते. मात्र वीज बिल भरण्यात न आल्याने कनेक्शन कापण्यात आले व शेतकऱ्यांच्या पिकांना होणारा पाणी पुरवठा बंद पडला. जर दोन दिवसांत पिकांना पाणी मिळाले नाही तर ते नष्ट होईल. (तालुका प्रतिनिधी)
अन् शेतकऱ्याचा हृदयघाताने मृत्यू
वीज कंपनीने धापेवाडा सिंचन योजनेचे कनेक्शन कापल्याने मागील सात दिवसांपासून उन्हाळी धानपिकांना पाणी मिळाले नाही. त्यामुळे धानपीक वाळले. आपल्या शेतातील पिकांचे निरीक्षण करण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याला पीक वाळल्याचे पाहून मोठाच ‘शॉक’ बसला व त्यातच तो गतप्राण झाला. ही घटना शुक्रवारी (दि.११) सायंकाळी ४.३० वाजता घडली. काशिराम तिमाजी उके रा.चिरेखनी असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. विद्युत विभागाने वीज कनेक्शन कापले नसते तर सदर शेतकऱ्याचा जीव वाचला असता, असे बोलले जात आहे. यासाठी वीज कंपनीसह धापेवाडा सिंचन योजनेच्या कार्यप्रणालीवरही मोठाच रोष व्यक्त केला जात आहे.
धापेवाडा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता व त्यांचे अधिनस्त कर्मचारी दरवर्षी प्रत्येक हंगामात शेतकऱ्यांकडून पाणीपट्टीची रक्कम पूर्णपणे वसूल करतात. मात्र ती रक्कम जमा न करता आपल्या वैयक्तिक कामात खर्च करतात व शेतकऱ्यांकडून वसुली न झाल्याच्या बोंबा ठोकतात, असा आरोप चिरेखनी येथील ग्रामस्थांसी केला आहे. या प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीसुद्धा ग्रामस्थांनी केली आहे.
अधिकाऱ्यांचे कानावर हात
आठ गावांतील धानपीक धोक्यात आल्याचे पाहून डॉ.सुशील रहांगडाले यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. उन्हाळी धानपिकांचे उत्पन्न निघताच शेतकऱ्यांकडून पाणी बिल वसुली करून वीज बिलाचा भरणा केला जाईल, असेही सांगितले. मात्र वीज विभागाचे अधिकारी काहीही ऐकण्यास तयार नाही. या प्रकाराकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देवून शेतकऱ्यांचे पीक वाचविण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे.
शेतकऱ्यांचे कार्यालयात ठाण
धापेवाडा उपसा सिंचन योजनेच्या नदीकाठावरील कार्यालयात चिरेखानी व लगतच्या गावातील शेतकरी शुक्रवारी सकाळी ८ वाजतापासून जमा झाले आहेत. जोपर्यंत उन्हाळी पिकांसाठी पाणी सोडण्यात येत नाही तोपर्यंत तिथेच ठाण मांडण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. रात्रभर शेतकरी तिथेच राहणार असल्याचे चिरेखानीचे माजी सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी घनश्याम पारधी यांनी सांगितले. सिंचन कार्यालयात जाऊन शेतकऱ्यांनी चौकशी केली असता त्यांच्याकडून जमा केलेली पाणीपट्टीची रक्कम कार्यालयातच असल्याचे सांगण्यात आले. मात्र शेतकरी पाणीपट्टी कर भरत नसल्याच्या उलट्या बोंबा सिंचन प्रकल्प कार्यालयाकडून मारल्या जात आहे.
शेतकऱ्यांकडून वसुली होत नाही?
या प्रकाराबाबत धापेवाडा उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता यासटवार यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, शेतकऱ्यांकडून वसुलीची रक्कम बरोबर प्राप्त होत नाही. आतापर्यंत वीज कंपनीचे १७ लाख रूपयांचे बिल थकीत आहे. पाण्याचा उपयोग शेतकरी करतील व बिलाचा भरणा शासन कसा करेल, असे शासनाचे म्हणणे आहे. काही प्रमाणात रक्कम भरून वीज जोडणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे ते म्हणाले.