त्यांनी नाही केले, तुम्ही करून दाखवा
By Admin | Updated: August 9, 2014 23:47 IST2014-08-09T23:47:16+5:302014-08-09T23:47:16+5:30
या आठवड्यात गोंदिया नगर पालिकेच्या राजकारणात एक तपानंतर मोठा बदल झाला आणि भाजप-सेना युतीचे पदाधिकारी पूर्ण बहुमताने प्रथमच सत्तेच्या खुर्चीवर विराजमान झाले. १२ वर्षापूर्वी अवघ्या

त्यांनी नाही केले, तुम्ही करून दाखवा
मनोज ताजने - गोंदिया
या आठवड्यात गोंदिया नगर पालिकेच्या राजकारणात एक तपानंतर मोठा बदल झाला आणि भाजप-सेना युतीचे पदाधिकारी पूर्ण बहुमताने प्रथमच सत्तेच्या खुर्चीवर विराजमान झाले. १२ वर्षापूर्वी अवघ्या ५ महिन्याचा अल्प काळ सोडला तर भाजपला कधीही नगर पालिकेत सत्तेची फळं चाखायला मिळाली नाहीत. कायम विरोधकांच्या भूमिकेत वावरताना सत्ताधारी काँग्रेस-राकाँ पदाधिकाऱ्यांच्या चुका उघडकीस आणण्याचे काम त्यांनी अनेक वेळा केले. पण आता बाजी पलटली आहे. विरोधी बाकावरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणारे तेच नगरसेवक आता सत्तेच्या बाकावर दिसणार आहेत. त्यामुळे आपल्या कामाची चुणूक दाखवून आम्ही काहीतरी वेगळे करू शकतो, असे दाखविण्याचे आव्हान आता नवीन सत्ताधाऱ्यांसमोर राहणार आहे.
शहराचे रंगरूप बदलविण्यासाठी गेल्या काही वर्षात चांगल्या योजना राबविण्यात ना कधी सत्ताधाऱ्यांनी ‘इंटरेस्ट’ दाखविला, ना विरोधकांनी कोणत्या योजनेचा आग्रह धरला. त्यामुळे गेल्या अनेक वर्षात गोंदिया शहराचे बकाल रूप कायम अजूनही कायम आहे. शहरातील एखाद्या चौकाचे सौंदर्यीकरण तर दूर, साधा स्वच्छ-सुंदर रस्ताही इथे पहायला मिळणे दुरापास्त आहे. योजना येतात आणि कागदावरच जिरतात, पण शहराचे चित्र मात्र बदलताना दिसतच नाही. कदाचित त्यामुळेच की काय अडीच वर्षापूर्वी शहरवासीयांनी न.प.मधील सत्ताधाऱ्यांच्या बाजुने कौल दिला नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेत दोन अपक्षांना आपल्या बाजुने वळवून सत्ता काबीज केली आणि दोन्ही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अडीच वर्षे राज केले. पण अडीच वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला जे जमले ते यावेळी काँग्रेसला आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी करणे जमले नाही आणि सत्तेची सूत्रे अखेर भाजप-सेनेच्या ताब्यात गेली.
विरोधी बाकावर बसण्याची सवय नसलेल्या काँग्रेस-राकाँच्या पदाधिकाऱ्यांना यावेळी पहिल्यांदाच हे सर्व जड अंत:करणाने सहन करावे लागत आहे. पण आता हाती असलेल्या अडीच वर्षाच्या कालावधीत भाजप-सेना युतीच्या पदाधिकाऱ्यांना बऱ्याच गोष्टी करून दाखवाव्या लागणार आहेत. शहरवासीयांच्या अपेक्षा पूर्ण करताना त्यांना जुन्या पदाधिकाऱ्यांकडून झालेल्या चुका दुरूस्त करून स्वच्छ प्रशासन देऊन खऱ्या अर्थाने विकासकामांकडे लक्ष द्यावे लागणार आहे. आधीच्या सत्ताधाऱ्यांच्या चुकांवर बोट ठेवताना जी भूमिका राहात राहात होती तीच भूमिका आताही कायम ठेवून आपल्या चुका काढण्याची संधी विरोधात बसलेल्या काँग्रेस-राकाँच्या पदाधिकाऱ्यांना देऊ नये. शहराच्या विकासाचा बॅकलॉग भरपूर आहे. तो एका झटक्यात भरून निघण्याची अपेक्षा नसली तरी त्या दृष्टीने वाटचाल सुरू करणे एवढी अपेक्षा तर रास्त आहे.