हे रेल्वेचे आरक्षित डबे आहेत की कोंबून भरलेली काळी-पिवळी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:35 IST2021-09-17T04:35:18+5:302021-09-17T04:35:18+5:30
गोंदिया : कोरोनाच्या संसर्गामुळे मागील दीड वर्षांपासून रेल्वे लोकल आणि पॅसेंजर गाड्या अद्यापही सुरू केल्या नाही. केवळ विशेष गाड्या ...

हे रेल्वेचे आरक्षित डबे आहेत की कोंबून भरलेली काळी-पिवळी !
गोंदिया : कोरोनाच्या संसर्गामुळे मागील दीड वर्षांपासून रेल्वे लोकल आणि पॅसेंजर गाड्या अद्यापही सुरू केल्या नाही. केवळ विशेष गाड्या सुरू असून या गाड्यांमध्ये तिकीट आरक्षित केल्याशिवाय प्रवास करता येत नाही. त्यामुळे विशेष गाड्यांमधील आरक्षित डब्यांमध्ये प्रचंड गर्दी वाढली असून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची पूर्णपणे ऐशीतैशी झाली आहे. आरक्षित डब्यांमधील गर्दी पाहता हे खरोखरच आरक्षित डबे आहेत की कोंबून भरलेली काळी-पिवळी, हे समजण्यास मार्ग नाही.
हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानक हे एक प्रमुख स्थानक असून या स्थानकावरून सद्य:स्थितीत दररोज ४७ गाड्या धावत आहेत. तर ७ हजारांवर प्रवासी दररोज ये-जा करीत आहेत. गोंदिया जिल्ह्याला मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ राज्याची सीमा लागून असल्याने या रेल्वे स्थानकावर सातत्याने प्रवाशांची वर्दळ असते. मागील दीड वर्षांपासून लोकल आणि पॅसेंजर गाड्या बंदच आहेत. त्यामुळे प्रवाशांना विशेष गाड्यांमध्ये आरक्षण करूनच प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे आरक्षित डब्यातील गर्दीत प्रचंड वाढ झाली आहे. काळी-पिवळी वाहनात जसे प्रवासी कोंबून भरले जातात तशीच स्थिती आरक्षित डब्यांची झाली आहे.
.............
डब्यांमध्ये विक्रेत्यांची अधिक गर्दी
सध्या केवळ विशेष आणि काही मोजक्याच गाड्या सुरू आहेत. या गाड्यांमध्ये खाद्य पदार्थ, पुस्तके व इतर किरकोळ सामानाची विक्री करून अनेक छोट्या विक्रेत्यांचा रोजगार चालतो. लोकल आणि पॅसेंजर गाड्या बंद असल्याने सुरू असलेल्या गाड्यांमधील आरक्षित डब्यांमध्ये विक्रेत्यांची सर्वाधिक गर्दी दिसून येत आहे.
...........
बोर्डाच्या आदेशाची प्रतीक्षा
लोकल आणि पॅसेंजर गाड्या सुरू करण्यासंदर्भात रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव तयार करून पाठविण्यात आला आहे. त्यांची मंजुरी मिळाल्यानंतर या गाड्या सुरू करण्यात येतील. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने गाड्यांमधील गर्दी वाढली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याच्या सूचनादेखील प्रवाशांना केल्या जात आहेत.
- जनसंपर्क अधिकारी, रेल्वे
...................
सर्वच गाड्यांत सारखीच स्थिती
-लोकमत प्रतिनिधीने गुरुवारी गोंदिया रेल्वे स्थानकाला भेट देऊन छत्तीसगढ एक्स्प्रेसच्या आरक्षित डब्यांची पाहणी केली असता त्या डब्यांमध्ये प्रचंड गर्दी होती. त्यामुळे हा आरक्षित डबा आहे की नाही, हे कळायला मार्ग नव्हता.
- इंटरसिटी, समता एक्स्प्रेस, हावडा-अहमदाबाद, आझाद हिंद एक्स्प्रेस या सर्वच गाड्यांची स्थिती एक सारखीच दिसली.
- या डब्यातील अनेक प्रवाशांनी मास्कसुद्धा लावले नव्हते. तर कोरोना प्रतिबंधात्मक नियम पूर्णपणे धाब्यावर बसविल्याचे चित्र होते.
..............