चार महिन्यांपासून अधिकारी नाही
By Admin | Updated: July 20, 2014 00:00 IST2014-07-20T00:00:30+5:302014-07-20T00:00:30+5:30
आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाच्या उद्देशाने शासनाने येथे स्वयंरोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र उघडले आहे. परंतु या कार्यालयात मार्च २०१४ पासून मार्गदर्शन अधिकारी नसल्याने सदर

चार महिन्यांपासून अधिकारी नाही
स्वयंरोजगार व माहिती केंद्र: विद्यार्थी व कर्मचारी अडले.
देवरी : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाच्या उद्देशाने शासनाने येथे स्वयंरोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र उघडले आहे. परंतु या कार्यालयात मार्च २०१४ पासून मार्गदर्शन अधिकारी नसल्याने सदर कार्यालयातील सर्व कामे रेंगाळलेली आहे. एकतर अधिकारी नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे विद्यावेतन रखडले आहे. तर कर्मचाऱ्यांचे वेतन सुद्धा अडून पडले आहेत.
सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र शासनाने आदिवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास घडविण्याकरिता आदिवासी भागात स्वयंरोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र उघडले आहे. या कार्यालयात ३१ मार्च २०१४ पुर्वी मार्गदर्शन अधिकारी म्हणून गोंदियाचे मार्गदर्शन अधिकारी भोयर यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार होता. या कार्यभाराची मुदत ३१ मार्च रोजी संपल्याने येथे आता कुणीही मार्गदर्शन अधिकारी नाही.
या मार्गदर्शन केंद्रात प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची एक बॅच ही साडेतीन महिन्याच्या कालावधीत असते. या प्रशिक्षणार्थ्यांचे विद्यावेतन मार्च १४ पासून मिळालेले नाही. सदर विद्यावेतन बँकेत जमा आहे. परंतु येथे कार्यरत अधिकारीच नसल्याने या प्रशिक्षणार्थ्यांना विद्यावेतन अद्याप मिळालेले नाही.
तसेच येथील कार्यरत कर्मचाऱ्यांना सुद्धा पगार मिळालेले नाही. याबाबद अधिक माहिती घेतली असता राज्याच्या स्वयंरोजगार मंत्रालयाकडूनच रिक्त पद अद्याप न भरल्याने ही समस्या निर्माण झाली असल्याचे कळले.
याबाबद येथील कार्यालयाकडून नागपूर कार्यालयाकडे व तेथून मुंबई मंत्रालयाकडे अनेक पत्रव्यवहार करण्यात आले आहे. तरी या गंभीर बाबींकडे लक्ष घालून या कार्यालयातील समस्यांचे निराकरण त्वरीत करण्यात यावे अशी मागणी आता विद्यार्थी व कर्मचाऱ्यांतून जोर धरू लागली आहे.