लोकमत न्यूज नेटवर्क, गोंदिया :राष्ट्रवादी काँग्रेसच्याअजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्रीकरणाचा अद्याप कुठलाच प्रस्ताव आलेला नाही. याची केवळ माध्यमातच चर्चा आहे, तसेच यावर मी व्यक्तिगत माझे विचार मांडणे योग्य नाही. आम्ही पक्षातील सर्व प्रमुख मंडळी चर्चा करू. त्या चर्चेत काही निघाले, तरच त्यावर काही बोलणे योग्य होईल. त्यापूर्वी यावर काहीही बोलण्याची गरज नसल्याचे खा. प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले.
खा. पटेल हे रविवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता माध्यमांशी संवाद साधला. उद्धवसेनेचे खा. संजय राऊत यांनी केंद्र सरकारने युद्धापासून माघार का घेतली आणि शस्त्रसंधी का स्वीकारली, असा सवाल उपस्थित केला. यावर खा. पटेल म्हणाले, देशाचा फायदा कुठल्या बाबतीत आहे, हे ज्यांना माहीत नसेल, अशांच्या बाष्कळ बडबडीला उत्तर देणे योग्य वाटत नाही. भारताला पहलगाम हल्ल्याला उत्तर देणे गरजेचे होते, असेही खा. पटेल याप्रसंगी बोलताना म्हणाले.