पदाधिकाऱ्यांच्या गावातच आरोग्य सेवेचे तीनतेरा
By Admin | Updated: August 23, 2015 00:15 IST2015-08-23T00:15:33+5:302015-08-23T00:15:33+5:30
जिल्हा परिषदेच्या अधिनस्थ असलेली प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील आरोग्य सेवा आजघडीला पूर्णत: कोलमडली आहे.

पदाधिकाऱ्यांच्या गावातच आरोग्य सेवेचे तीनतेरा
रुग्णांची गैरसोय : वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता
बोंडगावदेवी : जिल्हा परिषदेच्या अधिनस्थ असलेली प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील आरोग्य सेवा आजघडीला पूर्णत: कोलमडली आहे. यामुळे मात्र ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेची गैरसोय होत आहे. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषदेची आरोग्य सेवा वाऱ्यावर असताना पदाधिकारी मात्र सुस्त असल्याचे दिसत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चन्ना/बाक्टी येथे जिल्हा परिषदेच्यावतीने प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच बोंडगावदेवी येथे आयुर्वेदिक दवाखाना व आरोग्य उपकेंद्र चालविण्यात येत आहे. आरोग्य विभागाच्या या दवाखान्यावर जिल्हा परिषदेचे संपुर्ण नियंत्रण असते. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण (नियामक) व आरोग्य सल्लागार समितीचे अध्यक्ष प्रभागाचे जिल्हा परिषद सदस्य असतात. सध्या दोन्ही समित्यांवर कार्यकर्त्यांची वर्णी लागलेली दिसत आहे. परंतु गोरगरीब सामान्य जनतेला शासनाच्या आरोग्य सेवेचा लाभ मिळत नाही. तर पदाधिकारी पुढे येताना दिसत नाही.
चान्ना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दोन तज्ज्ञ डॉक्टरांच्या पदाला मंजुरी असल्याचे समजते. परंतु गेल्या कित्येक महिन्यांपासून तिथे तज्ज्ञ डॉक्टरच नसल्याने आरोग्य सेवेचे तीनतेरा वाजल्यासारखी गत झालेली दिसत आहे. तेथील डॉक्टर राजीव डोबे सहा महिन्यांसाठी प्रशिक्षणासाठी गेले आहेत. त्यामुळे पीएचसीचा कारभार पाहण्याची जबाबदारी येथील आयुर्वेदिक दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलसुंगे यांनी २२ जुन रोजी सांभाळली. डॉक्टर चन्नाला गेल्याने येथील दवाखाना डॉक्टरवीना पोरका झाला आहे. संपूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्राची जबाबदारी येथील आयुर्वेदिक दवाखानाच्या एका डॉक्टरवर येवून ठेपली आहे. सध्या उच्च प्रशिक्षित डॉक्टरांचा अभाव असल्याने परिसरातील गोरगरिबांना आरोग्य सेवा मिळणे दुरापास्त झाले आहे.
येथील आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्य सेविकांची बदली मोरगावला झाल्याने सध्या कंत्राटी आरोग्य सेवीकेवर आरोग्य उपकेंद्राची जबाबदारी आहे. नियमित आरोग्य सेविकेच्या अभावी परिसरातील महिला रुग्ण व गरोदर मातांची गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे. गावात तसेच बोंडगावदेवी जिल्हा परिषद प्रभागातील जिल्हा परिषदेची आरोग्य सेवा कोलमडून सामान्य जनतेची गैरसोय होत असताना जिल्हा परिषदेचे संबंधित पदाधिकारी सुस्त असल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)