नकली नोटांची १२ प्रकरणे अजूनही गुलदस्त्यात
By Admin | Updated: July 12, 2014 23:42 IST2014-07-12T23:42:04+5:302014-07-12T23:42:04+5:30
नकली नोटा चलनात आणून देशविघातक कृत्य करणाऱ्यांचे जाळे दूर-दूरपर्यंत पसरले आहे. परंतू आरोपींचा सुगावा पोलिसांना लागत नाही. गोंदिया जिल्ह्यात मागील सहा वर्षात नकली नोटांची

नकली नोटांची १२ प्रकरणे अजूनही गुलदस्त्यात
गोंदिया : नकली नोटा चलनात आणून देशविघातक कृत्य करणाऱ्यांचे जाळे दूर-दूरपर्यंत पसरले आहे. परंतू आरोपींचा सुगावा पोलिसांना लागत नाही. गोंदिया जिल्ह्यात मागील सहा वर्षात नकली नोटांची १४ प्रकरणे दाखल झालीत. परंतू त्यापैकी १२ गुन्ह्यांच्या मागोवा घेऊन त्यातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
नकली नोटा चलनात आणण्याचा गोरखधंदा मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्यात सुरु आहे. नकली नोट चलनात आणून त्यातून मालामाल होणाऱ्यांच्या या रॅकेटमध्ये जिल्ह्यातील काही लोक सहभागी असण्याच्या शंकेला नुकत्याच उघडकीस आलेल्या आमगाव येथील प्रकरणावरून बळकटी मिळत आहे. यासंदर्भात मागील सहा वर्षाची आकडेवारी घेतली असता गोंदिया जिल्ह्यात सहा वर्षात नकली नोटांसंदर्भात १४ गुन्हे दाखल झाल्याचे दिसून आले. यातील तीन गुन्हे उघडकीस आले तर १२ गुन्ह्यांचा मागोवा घेऊन त्यातील आरोपींना पकडण्यात अद्याप पोलिसांना यश आलेले नाही.
१८ मे २०१० रोजी ५०० रूपयाची एक नोट मिळाल्याने रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ९ सप्टेंबर २०११ रोजी ५०० रूपयाच्या २२ नोटा मिळाल्या होत्या. या प्रकरणात रामनगर पोलिसांनी बिहारच्या बोरिया जिल्ह्यातील महानागणी तालुक्याच्या नीनवलीया येथील मुकेशकुमार उर्फ कुलदेव बीरन मुखीया (३०), मुक्ती उर्फ चुमन जोगींदर मुखीया (२६) व नरेश रामधनी मुखीया (२०) या तिघांना अटक केली होती. परंतु १८ मे २०१० रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपींची माहिती पोलिसांना मिळाली नाही.
गोंदिया शहर पोलीस ठाण्यात सन २००८ पासून २०१३ या सहा वर्षाच्या काळात १२ गुन्हे दाखल झाले आहेत. यातील एका प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली. उर्वरीत ११ प्रकरणातील आरोपी फरार आहेत. सन २००८ मध्ये १०० रूपयाची एक नोट नकली आढळली. यात बँकेने दिलेल्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सन २००९ मध्ये २२ मार्च २००९ मध्ये १०० रूपयाच्या दोन बनावटी नोटा, १२ नोव्हेंबर २००९ रोजी ५०० रूपयाच्या ६ नोटा, १०० च्या ३ नोटा अशा ३३०० रूपयांच्या बनावटी नोटा, १० डिसेंबर २००९ रोजी ५० रूपयांच्या ३ नोटा नकली आढळल्या.
त्यानंतर १५ जानेवारी २०१० रोजी ५० रूपयाच्या १०३ नकली नोटा प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली. गोंदियाच्या सिव्हील लाईन येथील सतीश ऋषीलाल सोरले (२३), पंकज उर्फ मोनू गोविंद अग्रवाल (२०) रा. वसंतनगर गोंदिया व मोनू उर्फ विमलकुमार ज्वालाप्रसाद श्रीवास्तव (२४) रा.अंगुर बगीचा गोंदिया या तिघांना अटक करण्यात आली होती. ११ एप्रिल २०१० रोजी ५०० रूपयांच्या १३ बनावटी नोटा बँकेत आढळल्या. १० जुलै २०१० रोजी ५०० ची एक बनावट नोट, २० नोव्हेंबर २०१० रोजी ५०० रूपयाची एक तर १०० रूपयाची एक नोट बनावटी आढळली. ४ मे २०११ रोजी ५०० रूपयाची एक व १०० रूपयाची एक बनावट नोट आढळली. २३ जून २०१२ रोजी ३१ हजार ४५० रूपयांच्या बनावट नोटा आढळल्या. त्यात ५००, १०० व ५० च्या नोटा होत्या. ४ फेबु्रवारी २०१३ रोजी १०० ची एक नकली नोट व १३ नोव्हेंबर रोजी ५०० च्या ३४ नकली नोटा जप्त करण्यात आल्या.
नकली नोटांचा व्यापार अनेक दिवसांपासून जोमाने सुरू आहे. मोठे मासे या प्रकरणात अडकत नाही. या टोळीत काम करणारा सर्वात खालच्या स्तराची व्यक्ती अडकली जाते. मागील सहा वर्षात दाखल झालेली प्रकरणे बँकांच्या तक्रारीवरून झाल्याने पोलिसांना आरोपींना पकडता आले नाही. (तालुका प्रतिनिधी)