लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : साधारणतः आपल्याकडे मंगल सोहळ्याप्रसंगी वाद्य वाजविण्याची पंरपरा आहे. मात्र तालुक्यातील मुरदोली गावात कुठल्या मंगल कार्यासाठी नव्हे, तर चक्क रात्री वन्यप्राण्यांना पिटाळून लावण्यासाठी शेतकऱ्यांना वाद्य वाजवावे लागत आहे. एवढेच नव्हे तर पिकांचे नुकसान टाळण्यासाठी गावकरी रात्री जागरण करून आणि वाद्य वाजवून पिकांचे संरक्षण करीत असल्याचे बिकट चित्र येथे पाहायला मिळत आहे.
गोरेगाव तालुक्यातील अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. यावरच शेतकरी कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. आधीच शेतकरी नैसर्गिक संकटामुळे खचले आहे. त्यात आता त्यांना कृत्रिम संकटांना तोंड द्यावे लागत आहे. तालुक्यातील मुरदोली येथील शेतकरी वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या पिकांच्या नुकसानीमुळे त्रस्त झाले आहेत. मात्र कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी शेती केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी मुरदोली येथील शेतकऱ्यांनी एक नवी शक्कल लढविली. रात्रीच्या वेळेस वाद्य वाजवून वन्यप्राण्यांना पिटाळून लावण्याचा प्रयत्न करीत आहे.
हा येथील गावकऱ्यांचा नित्यक्रम झाला आहे. मुरदोली हे ६०० ते ७०० लोकवस्तीचे गाव. गावाच्या पूर्वेस घनदाट जंगल आहे. मुरदोली हे गावच नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पांतर्गत येते. त्यामुळे येथील शेतकऱ्यांची शेती जंगलाला लागूनच आहे. शेतात वन्यप्राण्यांचा वावर नेहमीच पाहायला मिळतो. शेतीची नासधूस हा नित्याचाच विषय झाला आहे.
त्यामुळे मुरदोली येथील शेतकरी दररोज जंगलालगत असलेल्या शेत पिकाला वाचविण्यासाठी जागरण करतात. रात्रभर या शेतशिवारात वाद्य वाजवून वन्यप्राण्यांना पिटाळून लावण्याचे काम करीत आहे. मुरदोली येथील या प्रकाराची चर्चा सध्या जिल्हाभरात आहे.
शेतकऱ्यांचा जीव धोक्यात
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात अंतर्गत येणाऱ्या मुरदोली जंगल परिसरात वाघ, बिबट, सांबर, रानहल्या, रानटी डुक्कर आदी प्राण्यांचा वावर नेहमीच पहायला मिळतो. मात्र यातील काही प्राणी हे पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. तर काही हे हिंस्र पशू मानवी जीवनासाठी धोकादायक ठरू शकतात. असे असले तरी मुरदोली येथील शेतकरी आपले जीव धोक्यात घालून पीक वाचविण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
"पीक वाचविण्यासाठी मुरदोलीवासीयांनी एक नवी शक्कल लढविली. पण या नव्या शक्कलीमुळे शेतकऱ्यांचा जीवही धोक्यात आलेला आहे. रात्रभर वाद्य वाजवून शेतकरी आपल्या पिकाचे संरक्षण करीत असले तरी त्यांच्या जिवाला मात्र धोका कधीही निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही."- रोशनलाल कटरे, शेतकरी मुरदोली
Web Summary : In Murdoli, Gondia, farmers face crop damage from wild animals. They're now playing instruments nightly to protect fields, risking their lives in the process near the Navegaon-Nagzhira Tiger Reserve.
Web Summary : गोंदिया के मुरदोली में, किसान जंगली जानवरों से फसल क्षति का सामना कर रहे हैं। अब वे खेतों की रक्षा के लिए रात में वाद्य बजा रहे हैं, जिससे नवेगांव-नागझिरा टाइगर रिजर्व के पास उनकी जान जोखिम में है।