धार्मिक भावना दुखावल्याने गोंदियात तणाव; नागरिकांनी गाठले पोलिस ठाणे
By अंकुश गुंडावार | Updated: April 16, 2025 21:04 IST2025-04-16T21:03:28+5:302025-04-16T21:04:39+5:30
समाजमाध्यमांवर व्हिडिओ झाला व्हायरल

धार्मिक भावना दुखावल्याने गोंदियात तणाव; नागरिकांनी गाठले पोलिस ठाणे
गोंदिया : शहरातील गणेशनगरातील एका व्यापाऱ्याने आपल्या दुकानात स्टाईल्सवर थोर महापुरूष व पवित्र श्रध्दास्थान असलेल्या ठिकाणाचे छायाचित्र असलेले स्टाईल्स लावून त्यावरून ये-जा करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ शहरात बुधवारी (दि.१६) व्हायरल झाला. या प्रकारामुळे धार्मिक भावना दुखावल्याने हे कृत्य करणाऱ्या त्या व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीला घेऊन संतप्त नागरिकांनी शहर पोलिस ठाणे गाठले. यामुळे काही वेळ तणावपुर्ण स्थिती निर्माण झाली होती. शहर पोलिसांनी वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळविल्याने तणाव निवळला.
गणेशनगरातील ज्या व्यापाऱ्याने थोर महापुरुष व पवित्र श्रध्दास्थान असलेल्या ठिकाणाचे छायाचित्र असलेले स्टाईल्स लावले व त्यावरुन ये-जा करीत होता. ही बाब एका व्यक्तीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या व्यापाराला असे छायाचित्र असलेले स्टाईल्स लावू नका असे सांगितले. मात्र त्या व्यक्तीने न ऐकल्यामुळे त्याने याचा व्हिडीओ तयार करुन तो सोशल माध्यमांवर व्हायरल केला. ही बाब शहरातील नागरिकांना कळताच लोकांनी आधी संबंधित व्यापाऱ्याचे दुकान गाठून त्याला चोप दिला. त्याच्या विरोधात आक्रोश व्यक्त करीत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार किशोर पर्वते, सहाय्यक पोलीस निरीक्षक गेडाम,डोंगरवार, पोलीस उपनिरीक्षक अक्षय चन्नावार व इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी त्वरीत घटनेचे गांर्भिय ओळखून गणेशनगर गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. तसेच हे कृत्य करणाऱ्या त्या व्यापाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. या दरम्यान गोंदिया शहरातील नेते,काही प्रतिष्ठीत नागरिक हजर झाले होते.
शहर पोलिस स्टेशनमध्ये नागरिकांची गर्दी
या प्रकरणातील आरोपीवर गुन्हा दाखल करुन त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी नागरिकांनी शहर पोलिस स्टेशनमध्ये गर्दी केली होती. शहर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली होती. मात्र यामुळे काही वेळ शहरात तणावपुर्ण स्थिती निर्माण झाली होती.