तेंदूपाने संकलनकर्त्यांना वन्यप्राण्यांपासून धोका
By Admin | Updated: May 15, 2014 01:28 IST2014-05-15T01:28:45+5:302014-05-15T01:28:45+5:30
रबी हंगाम संपला की शेतातील कामे संपुष्टात येतात. अल्प भूधारक व शेतमजुरांच्या हातांना काम मिळत नाही. शासनाची रोजगार हमी योजनासुध्दा कागदोपत्री असल्यामुळे दररोजचा प्रपंच चालविण्यासाठी ..

तेंदूपाने संकलनकर्त्यांना वन्यप्राण्यांपासून धोका
गोंदिया : रबी हंगाम संपला की शेतातील कामे संपुष्टात येतात. अल्प भूधारक व शेतमजुरांच्या हातांना काम मिळत नाही. शासनाची रोजगार हमी योजनासुध्दा कागदोपत्री असल्यामुळे दररोजचा प्रपंच चालविण्यासाठी उन्हाळ्यात तेंदूपत्ता गोळा करावा लागतो. जंगलातून तेंदूपाने संकलन करणार्या मजुरांना वन्यप्राण्यांपासून मोठा धोका आहे.यामुळे विमा सरंक्षण देण्याची मागणी होत आहे.
मजुरांना विमा संरक्षण नसल्यामुळे काही घटना घडल्यास त्यांच्या कुटुंबाला कोणतीही आर्थिक मदत मिळत नसल्याने मजुरांना विमा संरक्षण देणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील नागरिक पर्यायी रोजगार म्हणून तेंदूपत्ता संकलनाकडे पाहिले जाते. खेड्यापाड्यातील घराघरात लहानांपासून वृध्दांपर्यंत संपूर्ण कुटूंब या व्यवसायात गुंतलेले असतात. अगदी पहाटेला जंगलात जाऊन वन्यप्राण्यांशी सामना करीत तेंदूपत्ता गोळा करतात. परंतु त्यांना मिळत असलेल्या अल्प मोबदल्यात आपला जीव धोक्यात घालत असल्यामुळे त्यांच्या हाती धुपाटणे मिळत आहे. अर्जुनी/मोरगाव व सालेकसा तालुक्यातील घनदाट जंगलातून हा व्यवसाय गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे.
या व्यवसायातून कंत्राटदार व मालक मालदार झाले आहेत. तर मजूर मात्र अल्प उत्पन्नातून केविलवाणे जीवन जगण्याकरिता धडपड करीत आहेत. तेंदूपत्ता संकलन करणार्या मजुरांचे शोषण मात्र संपलेले नाही. या तालुक्यात अनेक वर्षापासून तेंदूपत्ता संकलनाचा व्यवसाय अविरत सुरू आहे.यासाठी प्रत्येक वन कार्यालयात तेंदूपत्ता संकलन विभाग असतो.
तेंदूपत्ता संकलनाला मे महिन्यात सुरूवात होत असते. १५ते २0 दिवसाचा हा हंगाम असतो. हा हंगाम सुरू होण्यापूर्वी तेंदूपत्ता युनिटच्या लिलावाची जाहिरात वर्तमानपत्रात प्रसिध्द करण्यात येते.त्यानंतर लिलाव होतो. त्यानंतर जंगलामध्ये बालमजुरांना घेऊन तेंदूपत्ता झाडाचे खुंटकटाईचे काम केल्या जाते. मे महिन्यांमध्ये प्रत्यक्ष तेंदूपत्ता संकलनाला सुरूवात केले जाते. शेतीच्या हंगामाच्या काळात शेतात राबराब राबायचे व उन्हाळ्यात मात्र दिवसभर उन्हात तेंदूपत्ता तोडायच्या कामात स्वत:ला गुंतवून चार पैसे मिळवायचे, असा नित्यक्रमच ठरला आहे. उन्हाळ्यात हाताला दुसरे काम नसल्यामुळे चार पैसे हातात मिळावे म्हणून जीवाचे रान केले जाते. अनेक वर्षापासून अगदी पिढीजात हे मजुरीचे काम करणार्यांची आर्थिक स्थिती अगदी बेताची आहे. (प्रतिनिधी)