दहा दिवसानंतर जिल्ह्यात एका कोरोना बाधिताची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 05:00 IST2020-06-13T05:00:00+5:302020-06-13T05:00:39+5:30
जिल्ह्यात मागील दहा दिवसात एकही कोरोना बाधित आढळला नव्हता. तर गोंदिया जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेला कोरोना बाधित बुधवारी कोरोनामुक्त झाला. त्यामुळे जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त झाला होता. मात्र जिल्हावासीयांसाठी हा आनंद केवळ एका दिवसा पुरताच मर्यादित ठरला. दुबईहून तिरोडा तालुक्यात स्वगृही परतलेला एका तरुणाच्या स्वॅब नमुन्याचा अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला.

दहा दिवसानंतर जिल्ह्यात एका कोरोना बाधिताची नोंद
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील सर्व कोरोना बाधित रुग्ण बुधवारपर्यंत (दि.१०) कोरोनामुक्त झाले होते. त्यामुळे जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त झाला होता. मात्र शुक्रवारी (दि.१२) दुबईहून तिरोडा तालुक्यात आलेला एका जणाचा स्वॅब नमुन्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ७० वर पोहचली असून यापैकी एक कोरोना अॅक्टीव्ह रुग्ण आहे.
जिल्ह्यात मागील दहा दिवसात एकही कोरोना बाधित आढळला नव्हता. तर गोंदिया जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेला कोरोना बाधित बुधवारी कोरोनामुक्त झाला. त्यामुळे जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त झाला होता. मात्र जिल्हावासीयांसाठी हा आनंद केवळ एका दिवसा पुरताच मर्यादित ठरला. दुबईहून तिरोडा तालुक्यात स्वगृही परतलेला एका तरुणाच्या स्वॅब नमुन्याचा अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कोरोना बाधिताचा अहवाल आल्यानंतर प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आत्तापर्यंत जिल्ह्यातील एकूण ११९० जणांचे स्वॅब नमुने घेवून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी ७० स्वॅब नमुन्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून १०९१ स्वॅब नमुन्याचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे.तर २९ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे. विशेष म्हणजे मागील दहा दिवसात जिल्ह्यात एकही कोरोना बाधित आढळला नव्हता.
बाहेरुन येणाऱ्यांवर बारीक नजर
जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होवू नये यासाठी जिल्हा आणि आरोग्य प्रशासनातर्फे विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहे. बाहेरील जिल्हा आणि राज्यातून येणाऱ्यावर बारीक नजर ठेवली जात असून त्यांची जिल्ह्याच्या सीमा तपासणी नाक्यावर आरोग्य तपासणी केली जात आहे. तर बाहेरील देशातून येणाऱ्या थेट शासकीय क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात आहे.