दूरभाष केंद्राची सेवा विस्कळीत
By Admin | Updated: July 19, 2015 01:34 IST2015-07-19T01:34:23+5:302015-07-19T01:34:23+5:30
जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी व नक्षलग्रस्त तालुका म्हणून परिचीत असलेल्या देवरी तालुक्यातील दुरसंचार विभागाची दुरभाष सेवा विस्कळीत झाल्याने ...

दूरभाष केंद्राची सेवा विस्कळीत
देवरी : जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी व नक्षलग्रस्त तालुका म्हणून परिचीत असलेल्या देवरी तालुक्यातील दुरसंचार विभागाची दुरभाष सेवा विस्कळीत झाल्याने तालुक्यातील शासकीय व खासगी आणि बँक सेवा ठप्प झाली आहे. या बाबीकडे येथील अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करीत आहेत. या कार्यालयात अधिकारी कार्यालयात राहत नसून इतरत्र भटकत असतात.
सविस्तर असे की, अतिदुर्गम आदिवासी व नक्षलग्रस्त तालुका म्हणून जिल्ह्यात परिचीत असलेल्या देवरी तालुक्यातील दुरसंचार विभागाची दुरभाष सेवा सध्या पूर्णपणे विस्कळीत झाली. यात देवरी, चिचगड व ककोडी केंद्राची नेट सेवा व लँडलाईन सेवा ठप्प झाली आहे. या देशात अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून केंद्रात सत्तेवर येणाऱ्या भाजप सरकारच्या नियंत्रणातील दुरभाष सेवा या तालुक्यात पूर्णपणे विस्कळीत झाली. जर या संबंधात तक्रार नोंदविण्यासाठी नागरिक या कार्यालयात गेले असता येथे अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित राहत नाही. अशा दुर्गम आदिवासी भागातील नेट सेवा आणि दुरध्वनी सेवा मागील ८-१० दिवसांपासून कोलमडली आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व शासकीय, खासगी लोकांना नेट सेवा बरोबर मिळत नाही. तसेच दुरध्वनी सेवाही पूर्णपणे बंद आहे. तरी या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देवून या समस्येचे निराकरण करण्यात यावे, अशी मागणी या तालुक्यातील पत्रकार संघ, व्यापारी संघटना, कर्मचारी संघटना तसेच दुरसंचार विभागाचे खातेदारांनी केली आहे.
या केंद्राचे उपविभागीय अभियंता चावला यांना या समस्येबाबत सांगण्याकरिता त्यांच्या भ्रमणध्वनीवर फोन केले असता त्यांचा भ्रमणध्वनी नेहमीच बंद दाखविते अशी येथील नागरिकांची तक्रार आहे. देवरी तालुक्यातील दूरसंचार सेवा विष्कळीत झाली असून याचा त्रास विद्यार्थी, शिक्षक, व्यापरी व नागरिकाना होत आहे. मात्र संबधित अधिकारी झोपेत आहेत. (वार्ताहर)