गुणवत्तेसाठी शिक्षकांची धडपड

By Admin | Updated: November 8, 2015 01:53 IST2015-11-08T01:53:53+5:302015-11-08T01:53:53+5:30

अनेकदा शिक्षण विभागाला पत्रव्यवहाराद्वारे कळवूनही उपयोग झाला नाही. वर्षभरापासून लोकप्रतिनिधींनीही दुर्लक्ष केले.

Teachers' tactics for quality | गुणवत्तेसाठी शिक्षकांची धडपड

गुणवत्तेसाठी शिक्षकांची धडपड

निलज खुर्द शाळेची व्यथा : शिक्षकांच्या कमतरतेकडे विभागाचे दुर्लक्ष
करडी (पालोरा) : अनेकदा शिक्षण विभागाला पत्रव्यवहाराद्वारे कळवूनही उपयोग झाला नाही. वर्षभरापासून लोकप्रतिनिधींनीही दुर्लक्ष केले. मुलांची शैक्षणिक गुणवत्ता ठासळू पाहत होती. अध्यापनाचे कार्य खंडीत होत होते. यावर उपाय म्हणून शिक्षकांनीच पुढाकार घेतला आणि स्वत:च्या वेतनातून दोन पदवीधरांची परस्पर नेमणूक केली. मोहाडी तालुक्यातील निलज खुर्द शाळेतील हा प्रकार आहे. शाळेत इयत्ता सहावी ते आठवीपर्यंतच्या शाळेत दोन पदवीधर शिक्षकांची पदे रिक्त असून मुख्याध्यापकाला स्वत:च तिन्ही वर्ग सांभाळावे लागत आहे.
निलज खुर्द येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत इयत्ता पहिली ते आठविपर्यंत शिक्षणाची व्यवस्था आहे. विद्यार्थी पटसंख्या १०८ आहे. प्राथमिक स्तरावरील वर्ग १ ते ५ मध्ये तीन शिक्षकांची नियुक्ती आहे. परंतू वर्ग ६ ते ८ मध्ये एकाच पदविधराची नियुक्ती आहे. सदर पदवीधर शिक्षक नरेंद्र देशमुख यांचेकडे मुख्याध्यापकाची जबाबदारी आहे.
शाळेचे अध्यापन व विविध कार्य, प्रशिक्षण, बैठका, सांभाळताना अध्यापनाचे कार्य मागे राहायचे. मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. गुणवत्ता ढासळण्याच्या मार्गावर आहे. दोन पदविधरांची नियुक्ती करावी, याबाबत गटशिक्षणाधिकारी मोहाडी यांना अनेकदा पत्रव्यवहार केला. मात्र कार्यवाही झाली नाही. शिक्षणाधिकारी व जिल्हा परिषद प्रशासनाला अनेकदा कळविण्यात आले. मात्र उपयोग झाला नाही.
शिक्षकांची कमतरता असल्याचे कारण प्रत्यकवेळी सांगण्यात आले, पण समस्याचे समाधान कुणीही काढले नाही. अच्छे दिनाचे नारे देणाऱ्यांनी सुद्धा बुरे दिन सुरू झाले असताना व्यवस्था परिवर्तनासाठी वेळीच पावले उचलली नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांची शैक्षणिक कुचंबना सुरू झाली.
कुणीही लक्ष देत नसल्याचे लक्षात आल्यानेच शाळेतील मुख्याध्यापकासह शिक्षकांनीच समस्येवर उपाय शोधण्याचे ठरविले. त्यांनी स्वत:च्या वेतनातून दोन शिक्षकांची मानधनावर परस्पर नियुक्त करून विद्यार्थ्यांच्या अध्यापनाचे कार्य सुरू करण्यात आले आहे.
एकीकडे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गळतीवर शासनाकडून चिंतन होत असताना शिक्षकांनी मुलांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांनी हाती घेतलेला उपक्रम शासन व समाजासमोर आदर्श ठरला आहे.(वार्ताहर)

Web Title: Teachers' tactics for quality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.