शिक्षकांचे चटोपाध्याय वेतनश्रेणीचे प्रकरण प्रलंबित
By Admin | Updated: November 18, 2016 01:48 IST2016-11-18T01:48:47+5:302016-11-18T01:48:47+5:30
शासनाने शिक्षक कर्मचाऱ्यांच्या ठराविक कालावधीतील सेवा ग्राह्य धरून त्यांच्या वेतनवाढीचे अध्यादेश नियम पारित केले आहे.

शिक्षकांचे चटोपाध्याय वेतनश्रेणीचे प्रकरण प्रलंबित
प्रकरण जि.प.मध्ये धूळखात: वाढीव वेतनश्रेणीपासून २३२ शिक्षक वंचित
आमगाव: शासनाने शिक्षक कर्मचाऱ्यांच्या ठराविक कालावधीतील सेवा ग्राह्य धरून त्यांच्या वेतनवाढीचे अध्यादेश नियम पारित केले आहे. यात ठराविक कालावधीतील कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाणे वेतनवाढ देणे अपेक्षित आहे. परंतु जिल्हा परिषद येथे वर्ष लोटूनही शिक्षकांचे चटोपाध्याय वेतनश्रेणीचे प्रकरण धूळखात पडून आहे.
शासनाने सेवा अंतर्गत शिक्षक कर्मचाऱ्यांना चटोपाध्याय वेतनश्रेणी मान्य करून या संदर्भात अध्यादेश पारित केले आहे. दरवर्षी या सेवाअंतर्गत शिक्षकांचे चटोपाध्याय वेतनश्रेणीचे प्रकरण रितसर जिल्हा परिषदेकडे मंजुरी मिळविण्याकरिता पाठविण्यात येतात. या प्रकरणांवर जिल्हा परिषद अंतर्गत मंजुरी देण्यात येते. परंतु मागील दीड वर्षापासून या प्रकरणांवर निर्धारित समितीची मंजुरी मिळाली नाही.
गोंदिया जिल्हा परिषद शिक्षण विभागात कार्यरत शिक्षकांना आश्वासित प्रगती योजनेंतर्गत चटोपाध्याय वेतनश्रेणीकरिता प्राथमिक शिक्षक १९४ पदविधर शिक्षक व केंद्रप्रमुख ३८ अशा एकूण २३२ शिक्षकांचे वाढीव वेतनश्रेणीचे प्रकरण वर्ष लोटूनही प्रलंबित आहेत.
शासन परिपत्रकाप्रमाणे शिक्षक कर्मचाऱ्यांना सलग बारा वर्षे प्रगतीपर सेवा अंतर्गत वरिष्ठश्रेणी मंजूर करून वाढीव वेतनश्रेणी तसेच २४ वर्षांनंतर आश्वासित प्रगती योजनेंतर्गत निवडश्रेणी वाढीव वेतनश्रेणीकरिता ग्राह्य आहे. या शिक्षकांच्या प्रस्तावांना नियमाप्रमाणे वेळ मर्यादेपर्यंत मंजुरी प्रदान करून वाढीव वेतने देणे अपेक्षित आहे. परंतु फायलींचा खर्च सांभाळणारी जिल्हा परिषद शिक्षकांच्या प्रस्तावांना धूळखात जमा करून ठेवले आहे. या प्रस्तावांचा निकाल लागावा यासाठी अनेकांचे प्रयत्न आहेत. परंतु या प्रस्तावांना चालणा मिळाली नसल्याचे दृश्य दिसून येत असल्याचे शिक्षक कर्मचारी सांगत आहेत. (शहर प्रतिनिधी)