विधानसभेतही धडा शिकवा- फडणवीस
By Admin | Updated: May 31, 2014 23:36 IST2014-05-31T23:36:24+5:302014-05-31T23:36:24+5:30
लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत देशातील जनतेने भारतीय जनता पक्षाच्या हाती सत्ता दिली. जनतेने आपले कर्तव्य पूर्ण केले. आता जनतेला दिलेल्या आश्वासनांची

विधानसभेतही धडा शिकवा- फडणवीस
भाजपाचा सत्कार मेळावा : खासदार व कार्यकर्त्यांचा गुणगौरव
गोंदिया : लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत देशातील जनतेने भारतीय जनता पक्षाच्या हाती सत्ता दिली. जनतेने आपले कर्तव्य पूर्ण केले. आता जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करण्याची वेळ आली आहे. येत्या विधानसभेच्या निवडणुकीतही जनतेने सत्तापक्षाला धडा शिकवावा असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केले.
जिल्हा भाजपच्यावतीने आयोजित कार्यकर्ता संमेलन व नवनिवार्चित खासदार तसेच कार्यकर्ता सत्कार समारंभात ते बोलत होते.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, भाजपच्या नेतृत्वातील सरकार जनतेच्या विश्वासावर खरी उतरणार यात शंका नाही. मात्र काही दिवसांनी राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयार राहण्याची गरज आहे.
शासकीय धान खरेदी केंद्र बंद करण्यात आल्याने गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील शेतकर्यांची लुबाडणूक होत आहे. शेतकर्यांची कमजोरी बघून व्यापारी धानाला कवडीमोल भावाने खरेदी करीत आहे. हा मुद्दा विधानसभेच्या आगामी सत्रात पहिल्याच दिवशी उचलून धरणार आहे. यावरही शासनाने धान खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला नाही तर भाजप-शिवसेना विधानसभेची कारवाई चालू देणार नसल्याचे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल होते. प्रमुख पाहुणे म्हणून नागपूरचे महापौर प्रा. अनिल सोले, मध्यप्रदेशचे कृषी मंत्री गैरीशंकर बिसेन, आमदार खुशाल बोपचे, आमदार राजकुमार बडोले, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मदन पटले, उपेंद्र कोठेकर, आशिष वांदीले, केशव मानकर, नेतराम कटरे, अशोक इंगळे, संतोष चव्हाण, दयाराम कापगते, हेमंत पटले, जिल्हा परिषद सभापती प्रकाश गहाणे, कुसन घासले, सविता पुराम व अन्य उपस्थित होते.
पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाला शुभारंभ करण्यात आला. दरम्यान खासदार नाना पटोले, बोधसिंह भगत यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा जिल्हा भाजप, भाजयुमो, जिल्हा ट्रक व ट्रॅक्टर यूनियन, जिल्हा परिषद व नगर परिषद पदाधिकार्यांकडून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पटोले यांनी आपल्या विजयाचे श्रेय कार्यकर्ता व मतदारांना दिले. प्रास्ताविक भाजप जिल्हाध्यक्ष अग्रवाल यांनी मांडले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)