शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी लक्ष्य वीटभट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 05:00 IST2021-02-11T05:00:00+5:302021-02-11T05:00:27+5:30
सध्या वीटभट्टीचे काम जोमाने सुरू आहे. या वीटभट्ट्यांवर शाळाबाह्य बालक काम करीत असतात. गोंदिया जिल्ह्यात ४०२ वीटभट्ट्या आहेत. या सर्व वीटभट्ट्यांवर बालरक्षक भेटी देऊन शाळाबाह्य बालके शोधत आहेत. ९ व १२ फेब्रुवारीदरम्यान ही शोधमोहीम राबविण्यात येत आहे. शाळाबाह्य मुले जे कधीच शाळेत न गेलेले विद्यार्थी, सतत तीस दिवस गैरहजर बालक, शिक्षणात मध्येच खंड पडलेले, स्थलांतरित, ड्राप बॉक्समधील बालकांची शोधमोहीम राबविण्यात येत आहे.

शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी लक्ष्य वीटभट्या
नरेश रहिले
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ६ ते १४ वयोगटातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शासन स्तरावरून विविध प्रयत्न केले जात आहेत. तरीही सद्य:स्थितीत १०० टक्के मुले अनेक कारणांमुळे शिक्षणाच्या प्रवाहात नाहीत. गोंदिया जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आता शिक्षण विभागाने ‘मिशन वीटभट्टी’ उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. या उपक्रमांतर्गत गोंदिया जिल्ह्यातील ४०२ वीटभट्ट्यांवर बालरक्षकांची चमू जाऊन शाळाबाह्य बालकांचा शोध घेत आहेत. या उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी ४४ बालकांचा शोध घेण्यात आला.
सध्या वीटभट्टीचे काम जोमाने सुरू आहे. या वीटभट्ट्यांवर शाळाबाह्य बालक काम करीत असतात. गोंदिया जिल्ह्यात ४०२ वीटभट्ट्या आहेत. या सर्व वीटभट्ट्यांवर बालरक्षक भेटी देऊन शाळाबाह्य बालके शोधत आहेत. ९ व १२ फेब्रुवारीदरम्यान ही शोधमोहीम राबविण्यात येत आहे. शाळाबाह्य मुले जे कधीच शाळेत न गेलेले विद्यार्थी, सतत तीस दिवस गैरहजर बालक, शिक्षणात मध्येच खंड पडलेले, स्थलांतरित, ड्राप बॉक्समधील बालकांची शोधमोहीम राबविण्यात येत आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता स्वत:ची आरोग्यविषयक काळजी घेऊन शाळाबाह्य बालकांना दाखल करण्यात येत आहे. दगडखाण, वीटभट्टी, अस्थायी, भटके कुटुंब, बांधकाम, रेडलाइट एरिया, वीटभट्ट्या व तत्सम, तसेच भीक मागणारे कुटुंब, रेल्वे स्टेशन, बस स्टँड याठिकाणी बालरक्षक शोधमाेहीम राबवीत आहेत. गोंदिया जिल्ह्यात ४०२ वीटभट्ट्या आहेत. त्यात तिरोडा तालुक्यात ३६, अर्जुनी मोरगाव ४४, देवरी १४, सालेकसा ९४, गोरेगाव ५८, आमगाव २१, सडक-अर्जुनी ४२, सडक अर्जुनी ४२ व गोंदिया तालुक्यात ९३ वीटभट्ट्या आहेत.
या बालकांना केले शाळेत दाखल
सुखदेवटोली गोंदिया येथील वीटभट्टीवर दोन शाळाबाह्य बालके आढळली. त्यात शिवाकुमार अश्विनकुमार लहारे (१०) (छत्तीसगड) हा कधीच शाळेत गेला नाही. शिवानीकुमारी संतकुमार केसकर (१०) वर्ग चौथी ही मुलगी छत्तीसगड येथे दाखल आहे. ४ बालके फत्तेपूर शाळेत दाखल आहेत. नकुल संतोष कुंभरे पहिली, रोहन संतोष कुंभरे, पहिली, मानसी हेमराज गजभिये, तिसरी, सलोनी हेमराज गजभिये, अंगणवाडी यातील दोन बालकांना फत्तेपूरच्या जवळच्या शाळेत दाखल करण्यात येणार आहे. ओझाटोला, येथे वीटभट्टीवर शाळाबाह्य बालकांचा शोध घेण्यात आला. तेथे २ बालके छत्तीसगड येथील आहेत. मुस्कान शशी रात्रे, वर्ग सहावा, ऋषभकुमार मनाषीकुमार रात्रे, वर्ग पहिली ही दोन्ही बालके जांजगीर, छत्तीसगढ येथे दाखल आहेत. मे महिन्यापर्यंत राहणार आहेत. त्यांना जवळच्या ओझाटोला व फत्तेपूर शाळेत दाखल करण्यात येणार आहे. शिक्षण हमी पत्रक देण्यात येणार आहे, असे जिल्हा समन्वयक कुलदीपिका बोरकर यांंनी सांगितले आहे.
पहिल्याच दिवशी सहा तालुक्यांत आढळली ४४ बालके
शाळाबाह्य शोधमोहिमेच्या पहिल्याच दिवशी ९ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील सहा तालुक्यांत ४४ शाळाबाह्य बालके आढळली. त्यात आमगाव ७, देवरी १, गोरेगाव १५, तिरोडा ११, सालेकसा ६, गोंदिया ४, अशी ४४ बालके शाळाबाह्य असल्याचे आढळले आहे.