तलाठी व कोतवालची मागणी
By Admin | Updated: September 15, 2014 00:14 IST2014-09-15T00:14:18+5:302014-09-15T00:14:18+5:30
तिरोडा तहसील कार्यालयांतर्गत येणाऱ्या तलाठी साजा- १८ ग्राम धादरी येथे मागील एक वर्षापूर्वी तलाठी मेश्राम यांचे स्थानांतर तिरोडा येथे करण्यात आले आहे. अतिरिक्त पदभार असलेले

तलाठी व कोतवालची मागणी
इंदोरा बुज.: तिरोडा तहसील कार्यालयांतर्गत येणाऱ्या तलाठी साजा- १८ ग्राम धादरी येथे मागील एक वर्षापूर्वी तलाठी मेश्राम यांचे स्थानांतर तिरोडा येथे करण्यात आले आहे. अतिरिक्त पदभार असलेले तलाठी केवळ आठवड्यातून दोनच दिवस येत असल्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांना मोठीच समस्या निर्माण होत आहे.
बदली झालेले तलाठी मेश्राम यांच्या जागी सरांडी साज्याचे तलाठी नागदेवे यांना अतिरिक्त कारभार सोपविण्यात आले. साजा- १८ धादरीमध्ये पाच गावांचा समावेश आहे. या साज्यासाठी अतिरिक्त तलाठी नागदेवे आठवड्यात फक्त दोन दिवस येतात. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना तलाठ्याअभावी फार त्रास सहन करावा लागतो.
तलाठी हा शेतकऱ्यांचा जवळचा मित्र म्हणावा लागेल. परंतु शेतकऱ्यांना दररोज तलाठ्यांशी काम पडतो तेव्हा तलाठी वेळेवर हजर राहत नाही. त्यांची चातकासारखी वाट पहावी लागते. जेव्हा तलाठी येतो तेव्हा काही शेतकरी आपल्या दुसऱ्या कामात व्यस्त राहतात. त्यामुळे त्यांची भेट होत नाही. वेळेवर कुठलेच काम होत नाही. विद्यार्थ्यांनासुद्धा शालेय कामासाठी लागणाऱ्या विविध प्रमाणपत्रांसाठी तलाठ्यांची वाट पहावी लागते. मात्र त्यांच्या अनुपस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे काम होत नाही. त्यामुळे साजा-१८ धादरीला कायमस्वरूपी तलाठी देण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार तिरोडा यांना केली आहे.
धादरी-उमरी गावात कोतवालाचे पदसुद्धा रिक्त आहे. मागील १० वर्षांपूर्वी या गावातील कोतवाल सेवानिवृत्त झाले होते. तेव्हापासून या गावाला कोतवाल देण्यात आले नाही. कोतवालाअभावी शासनाची माहिती गावकऱ्यांपर्यंत पोहचत नाही. तलाठी व कोतवाल नसल्याने हे गाव राजस्व विभागापासून फार दूर गेले आहे.
तहसीलदारामार्फत कोतवाल पदाची भरती करण्यात आली. मात्र या साजा-१८ साठी कोतवालाचे पद भरतीपासून मुक्त ठेवण्यात आले. तालुकास्तरावर कोतवाल भरती करूनसुद्धा धादरी गावाला १० वर्षापासून कोतवाल देण्यात आले नाही. तेव्हा धादरी, उमरी, सालेबर्डी, खुरखुडी व सोनाली या पाच गावांसाठी तलाठी व कोतवालाची स्थाई नियुक्ती करण्याची मागणी जोर धरत आहे. (वार्ताहर)