वैद्यकीय विमाछत्र योजनेचा लाभ घ्या
By Admin | Updated: August 9, 2014 23:48 IST2014-08-09T23:48:23+5:302014-08-09T23:48:23+5:30
उतारवयात वैद्यकिय सेवेची गरज लक्षात शासनाने ९ जुलै २०१४ रोजीच्या शासन निर्णयान्वये कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकिय अधिकारी/कर्मचारी व अखिल भारतीय सेवेतील

वैद्यकीय विमाछत्र योजनेचा लाभ घ्या
गोंदिया : उतारवयात वैद्यकिय सेवेची गरज लक्षात शासनाने ९ जुलै २०१४ रोजीच्या शासन निर्णयान्वये कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकिय अधिकारी/कर्मचारी व अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांकरिता वैद्यकिय प्रतिपूर्ती विमाछत्र योजना लागू केली आहे. संबंधितांनी या योजनेचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी यांनी केले. शासनाची ही विमाछत्र योजना राबविण्याच्या उद्देशातून येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ८ आॅगस्ट रोजी आयोजित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत ते बोलत होते.
या कार्यशाळेला जिल्हा कोषागार अधिकारी दिंगबर नेमाडे, अप्पर कोषागार अधिकारी डॉ. अर्चना सोलंकी, उप कोषागार अधिकारी अ.उ.हुमणे व एम.डी.इंडिया हेल्थ केअर सर्व्हीसेसचे शाखा प्रमुख विनय गोसावी प्रामुख्याने उपस्थित होते. या योजनेची माहिती देताना कोषागार अधिकारी नेमाडे यांनी, शासकीय सेवेत कार्यरत अ,ब व क वर्गातील अधिकारी/कर्मचारी या योजनेत समाविष्ट असून शासकीय सेवेत कार्यरत अन्य कुणास या योजनेत सहभागी व्हायचे असल्यास वार्षिक हप्ता भरून सहभागी होता येणार असल्याचे सांगीतले.
तसेच या योजनेंतर्गत आंतररूग्ण म्हणून झालेला खर्च प्रतिपुर्तीसाठी अनुज्ञेय राहणार असून विमा पॉलिसीत नमुद ठराविक बाह्यरूग्ण उपचारांसाठीही विमाछत्र उपलब्ध राहणार आहे. संबंधितांना वैद्यकिय चाचणीची पूर्व अट राहणार नसून योजनेत समावेश करताना असलेल्या आजारांनाही पॉलिसीत नमूद केल्याप्रमाणे विमाछत्र राहणार असल्याचे सांगीतले.
तसेच ३० जून २०११ नंतर सेवानिवृत्त झालेले कोणतेही अधिकारी/कर्मचारी स्वेच्छेने या योजनेत आवश्यक तो वार्षिक हप्ता भरून सहभागी होऊ शकेल अशी माहिती दिली. तर अप्पर कोषागार अधिकारी अर्चना सोलंकी यांनी, या योजनेचा लाभ घेण्यास संबंधीतांना प्रोत्साहीत करावे असे आवाहन केले.
हुमणे यांनी, आंतररूग्ण
उपचारांसाठी राज्यातील एक हजार २०० रूग्णालय नोंदणीकृत असून जिल्ह्यातील पाच रूग्णालयांचा यात समावेश असल्याची माहिती दिली. या रूग्णालयात कॅशलेस पद्धतीने उपचार घेण्याची सोय राहणार असून रूग्णालयात भर्ती झाल्यानंतर आगावू रक्कम भरावी लागणार नाही. तर रूग्णालयातील सर्व खर्च कंपनीकडून थेट रूग्णालयास प्रदान केला जाईल. तसेच पती व पत्नी दोघेही योजनेत स्वतंत्रपणे सहभागी झाल्यास त्यांच्या विमा हप्त्याच्या एकत्रित रकमेनुसार दोघांसाठी एकत्रित विमाछत्र अनुज्ञेय राहणार असल्याचे सांगीतले. विशेष म्हणजे गोसावी यांनी पावर पॉईंट प्रेजेंटेशनच्या माध्यमातून उपस्थितांना योजनेबाबतची सविस्तर माहिती दिली.
दरम्यान कार्यशाळेला उपस्थित अधिकाऱ्यांच्या विविध शंकांचे निराकरण अधिकाऱ्यांकडून करण्यात आले. तर येथील कोषाघार अधिकारी कार्यालयात कार्यरत हि.डो.खांडेकर, अ.सु.दहिवले व एम.एच.टेंभरे हे येत्या ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणार असल्याने त्यांचे प्रपत्र-ब कार्यशाळेतच भरून घेण्यात आले.
या कार्यशाळेचे प्रास्तावीक कोषागार अधिकारी नेमाडे यांनी मांडले. तर उपस्थितांचे आभार अप्पर कोषागार अधिकारी अर्चना सोलंकी यांनी मानले. या कार्यशाळेला सुमारे १५० आहरण व संवितरण अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)