आरोग्य योजनांचा लाभ घ्या
By Admin | Updated: March 13, 2015 01:49 IST2015-03-13T01:49:33+5:302015-03-13T01:49:33+5:30
आरोग्यविषयक विविध योेजना शासन राबवित आहे. विशेषत: महिलांनी या योजनांचा लाभ घेवून निरोगी रहावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केले.

आरोग्य योजनांचा लाभ घ्या
गोंदिया : आरोग्यविषयक विविध योेजना शासन राबवित आहे. विशेषत: महिलांनी या योजनांचा लाभ घेवून निरोगी रहावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केले.
ग्रामीण रुग्णालय सालेकसा येथे मंगळवार (दि.१०) राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत वैद्यकीय व दंत चिकित्सा शिबिराचे उद्घाटन डॉ. सैनी यांनी केले. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प. महिला व बालकल्याण समिती सभापती सविता पुराम होत्या. या वेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिश कळमकर, बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजीव दोडके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ. सैनी पुढे म्हणाले, राज्याच्या तुलनेत गोंदिया जिल्ह्यातील अर्भक मृत्यू दर व माता मृत्यू दर कमी झाले आहे. जिल्ह्यात ९९ टक्के स्त्रियांची प्रसूती ही शासकीय रुग्णालयातच होत आहे. महिलांच्या आरोग्याकडे लक्ष देवून राज्यात महिला आरोग्य अभियान पंधरवाडा सुरू आहे. या अभियानांतर्गत २६ फेब्रुवारी ते १२ मार्चपर्यंत जास्तीत जास्त महिलांनी न संकोचता निरोगी राहण्यासाठी आपली आरोग्य तपासणी करावी, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी जिल्ह्यात मानव विकास योजना राबविण्यात येत आहे. आरोग्य विभागाच्या वतीने जननी सुरक्षा योजना, राजीव गांधी जीवनदायी योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा जिल्ह्यातील जास्तीत-जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे सांगून ते म्हणाले, आशा सेविकांनी समुपदेशनाच्या माध्यमातून महिलांना आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रमुख अतिथी डॉ. रवी धकाते म्हणाले, ग्रामीण भागातील जनतेने आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा. जास्तीत जास्त आरोग्यविषयक योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिश कळमकर, बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजीव दोडके यांनीही मनोगत व्यक्त केले.
शिबिरात डॉ. हिंमत मेश्राम, डॉ. प्रशांत मेश्राम, नेत्रतज्ज्ञ डॉ. कांबळे व डॉ. बागडे, डॉ. मनिष बत्रा आदी तज्ज्ञ डॉक्टर्संनी रुग्णांची तपासणी करून उपचार केले. शिबिरात सालेकसा, आमगाव व देवरी तालुक्यातील ९७० रुग्णांची तपासणी केली. १० ते १२ मार्चपर्यंत सुरू राहणाऱ्या या वैद्यकीय व दंत शिबिरात तीन हजाराच्यावर रुग्ण लाभ घेतील, असे सांगण्यात आले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते आरोग्य दैवत धन्वंतरी, पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्ज्वलित करण्यात आले.
प्रास्ताविक सालेकसा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेंद्र घागरे यांनी केले. संचालन व आभार समुपदेशक नितीन फुलझेले यांनी मानले. कार्यक्रमास सालेकसा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंदू वंजारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अरविंद खोब्रागडे, डॉ. सुषमा नितनवरे, डॉ. विवेक अनंतवार, खंडविकास अधिकारी व्ही.यु. पचारे, पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे, आरोग्य सेवक-सेविका, आशा सेविका, समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी, मदर टेरेसा नर्सिंग विद्यालयाच्या विद्यार्थिनी, रुग्ण व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)