स्वॅब नमुने तपासणी प्रयोगशाळा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:01 IST2020-06-09T05:00:00+5:302020-06-09T05:01:26+5:30
जिल्हाधिकारी कार्यालय येथे आ. विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. विनायक रु खमोडे उपस्थित होते.

स्वॅब नमुने तपासणी प्रयोगशाळा सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने स्वॅब नमुने तपासणीची प्रयोगशाळा येथील शासकीय महाविद्यालयात स्थापन करण्यात आलीे.या प्रयोगशाळेचे सोमवारी (दि.८) राज्याचे गृहमंत्री तथा जिल्हा पालकमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ई उद्घाटन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे आ. विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. विनायक रु खमोडे उपस्थित होते. यादरम्यान पालकमंत्री अनिल देशमुख यांनी या वेळी जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने परिस्थितीच्या आढावा घेतला. जिल्ह्यात दोन कोरोना बाधित रुग्ण शिल्लक असल्याची माहिती घेतली तसेच प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांना त्यांनी शुभेच्छा देऊन सर्वांचे कौतुक केले.
पूर्वी कोरोना चाचणीसाठी सर्व नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येत होते. त्यासाठी तीन ते पाच दिवसांचा कालावधी लागत होता. मात्र आता जिल्ह्यात कोरोना चाचणी प्रयोगशाळेच्या तपासणी केंद्रामुळे केवळ सहा तासात नमुने चाचणीचे अहवाल प्राप्त होतील. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी जिल्हा आणखी दक्षतेने सज्ज होईल असे सांगितले.
पालकमंत्र्यांनी या वेळी कोरोना चाचणी प्रयोगशाळा तपासणी केंद्राची कार्यप्रणाली डॉ.दिलीप गेडाम यांच्याकडून जाणून घेतली. डॉ. गेडाम यांनी सांगितले की, या मशीनची क्षमता एका दिवसात १२० नमुने तपासणी करण्याची आहे. आॅटोमोेटेड आरएनए मशीन लवकरच येणार आहे.ती आल्यानंतर नमुने तपासणी क्षमता दुप्पट होणार असल्याचे त्यांनी सांगितले. येथील कोरोना चाचणी प्रयोगशाळा तपासणी केंद्राकरिता जिल्हा नियोजन समितीमधून १ कोटी ८० लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. त्यातील १ कोटी ५२ लाख रुपये प्रयोगशाळेतील विविध उपकरणावर खर्च करण्यात आला आहे.
दररोज १२० नमुन्यांची चाचणी शक्य
या प्रयोगशाळा तपासणी केंद्राकरिता एक मुख्य तपासणी अधिकारी, तीन सहायक तपासणी अधिकारी व इतर तांत्रिक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून सर्वांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे.या प्रयोगशाळा तपासणी केंद्रामुळे कोरोना संशियतांचे निदान लवकर होण्यास मदत होणार आहे. या प्रयोगशाळेत दररोज १२० स्वॅब नमुन्यांची चाचणी करणे शक्य आहे.
पहिल्याच दिवशी तीन नमुन्यांची यशस्वी चाचणी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील स्वॅब नमुने तपासणी प्रयोगशाळेत पहिल्याच दिवशी तीन नमुन्यांची चाचणी करण्यात आली. या तिन्ही नमुन्यांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला. याच नमुन्यांची नागपूर येथील एम्स आणि मेयोच्या प्रयोगशाळेतून चाचपणी करण्यात आली. त्यात गोंदिया येथील प्रयोगशाळेचा अहवाल योग्य असल्याची बाब पुढे आली.