फरार आरोपीचे आत्मसमर्पण
By Admin | Updated: January 20, 2015 22:38 IST2015-01-20T22:38:26+5:302015-01-20T22:38:26+5:30
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या सापळा रचून केलेल्या कारवाईदरम्यान फरार झालेल्या दुसऱ्या आरोपीने गोंदियाच्या वनपरिक्षेत्र कार्यालयात सोमवारी (दि.१९) आत्मसमर्पण केले.

फरार आरोपीचे आत्मसमर्पण
गोंदिया : वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या सापळा रचून केलेल्या कारवाईदरम्यान फरार झालेल्या दुसऱ्या आरोपीने गोंदियाच्या वनपरिक्षेत्र कार्यालयात सोमवारी (दि.१९) आत्मसमर्पण केले. विनोद गोविंदा सारंगपुरे (३४) रा. श्रीनगर असे त्या समर्पित आरोपीचे नाव आहे.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अवैधरीत्या सागाची लाकडे वाहतूक करणाऱ्या मिनी मेटॅडोअरला (एमएच ३५/के-२२७१) पकडले. ही कारवाई रविवारी (दि.१८) रात्री ८ वाजता गोंदियाच्या निर्मल टॉकिजजवळ करून मिनी मेटॅडोअर चालक व मालक राजेश बाबुलाल सोनुले (४२) रा. फुलचूर याला अटक करण्यात आली होती. मात्र कारवाईदरम्यान त्याच्या साथीदाराने पळ काढला होता. त्या फरार आरोपीने स्वत:च गोंदिया वन परिक्षेत्र कार्यालयात येवून आत्मसमर्पण केले. त्यामुळे राजेश व विनोद या दोघांना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी न्यायालयात हजर करवून एक दिवसाची वनकोठडी मिळवून घेतली.
दोन्ही आरोपींनी चौकशीदरम्यान सांगितलेल्या माहितीवरून गोंदियाच्या वाजपैयी वार्डात धाड घालून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिथे साठविलेली लाकडे जप्त केली. शिवाय लाकडांच्या सालीसुद्धा जप्त केल्या.
मात्र पुरेशा वेळेअभावी व मनुष्यबळाअभावी त्या लाकडांची मोजणी सद्यस्थितीत होवू शकली नसल्याचे वनपरिक्षेत्राधिकारी आनंद मेश्राम यांनी सांगितले. काही लाकडे अंजनाची असून त्यांची तपासणी सध्या सुरू आहे. (प्रतिनिधी)