घरकूल लाभार्थ्यांना कोणत्या रेती घाटावरून रेतीचा पुरवठा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:27 IST2021-02-07T04:27:23+5:302021-02-07T04:27:23+5:30
नवेगावबांध : शासनाने घरकूल योजनेंतर्गत नवेगावबांध ग्रामपंचायतीला या वर्षी जवळपास सहाशे घरकुलांना बांधकामाची मंजुरी मिळाली आहे. रेती घाटांचे लिलाव ...

घरकूल लाभार्थ्यांना कोणत्या रेती घाटावरून रेतीचा पुरवठा?
नवेगावबांध : शासनाने घरकूल योजनेंतर्गत नवेगावबांध ग्रामपंचायतीला या वर्षी जवळपास सहाशे घरकुलांना बांधकामाची मंजुरी मिळाली आहे. रेती घाटांचे लिलाव झाले नसल्याने घरकुलांचे बांधकाम रखडले आहे. त्यामुळे यावर तोडगा काढत शासनाने घरकूल लाभार्थ्यांना मोफत पाच ब्रास रेती उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, पण या परिसरातील घरकूल लाभार्थ्यांना नेमक्या कोणत्या रेती घाटांवरून रेतीचा पुरवठा केला जाणार, याकडे लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
गोंदिया जिल्ह्यातील रेती घाटांचे लिलाव न झाल्याने, एका घरकुलाला पाच ब्रास रेती, याप्रमाणे ६०० घरकुलांना तीन हजार ब्रास रेती लागणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि राज्य पर्यावरण समितीची न मिळालेली मंजुरी यामुळे रेती घाटांचे लिलाव झाले नव्हते. त्यामुळे घरकूल लाभार्थ्यांना रेती मिळत नव्हती, तर रेती माफिया अव्वाच्या सव्वा दराने रेतीची विक्री करीत असल्याने त्याचा आर्थिक भुर्दंड लाभार्थ्यांना बसत होता. एकीकडे शासनाचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी हे रेती माफियांच्या विरोधात कारवाई करण्याचे निर्देश देतात, तर दुसरीकडे आजपर्यंत कुठल्याही रेती घाटाचे लिलाव नसतानाही एकाही व्यक्तीच्या घराचे बांधकाम रखडलेले नाही. शासनाने कंत्राट दिलेले एकही कंत्राट काम बंद नाही. मग या बांधकामाला लागणारी रेती येते कुठून, हा प्रश्न गुलदस्त्यातच आहे. मात्र, या सर्व प्रकारांमुळे सर्वसामान्य जनतेला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. दोन हजार रुपये ट्रॉलीची रेती साडेचार पाच हजारांवर विकली जात आहे. मात्र, या सर्व प्रकाराकडे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.
......
सर्वसामान्यांना रेती उपलब्ध करून द्या
शासनाने घरकूल लाभार्थ्यांची समस्या जाणून घेत, त्यांना पाच ब्रास रेती मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय स्वागतार्ह असून, याच धर्तीवर शासनाने सर्वसामान्य नागरिकांनाही रेती उपलब्ध करून देऊन, रेतीचा होत असलेला काळाबाजार थांबवावा, अशी मागणी परिसरातील गावकऱ्यांनी केली आहे.