उमेदवारीसाठी दावेदारांची दमछाक
By Admin | Updated: June 9, 2014 23:41 IST2014-06-09T23:41:24+5:302014-06-09T23:41:24+5:30
लोकसभा निवडणुकीचे रणसंग्राम संपले. महायुतीचे केंद्रात शासन आल्यानंतर त्या चर्चा आता संपल्या. सध्या चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. लोकसभेचे यश-अपयश

उमेदवारीसाठी दावेदारांची दमछाक
संतोष बुकावन - अर्जुनी/मोरगाव
लोकसभा निवडणुकीचे रणसंग्राम संपले. महायुतीचे केंद्रात शासन आल्यानंतर त्या चर्चा आता संपल्या. सध्या चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. लोकसभेचे यश-अपयश विसरून सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभेकडे लक्ष केंद्रित केले आहे. सध्या इच्छुक उमेदवारांना विधानसभेच्या उमेदवारीचे डोहाळे लागले आहेत. त्या दृष्टीने प्रत्येक इच्छुक उमेदवार आपल्या कुवतीप्रमाणे ‘फिल्डींग’ लावण्याच्या कामात मश्गुल आहे. अर्जुनी/मोरगाव मतदारसंघात भाजपात उत्साह संचारला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकसभा निवडणुकीनंतर शुकशुकाट दिसून येत आहे. एरवी आपापल्या पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांच्या भरगच्च उपस्थितीत गप्पा मारतांना दिसणारे आता दिसेनासे झाले आहेत. एकंदरीत लोकसभेच्या निकालानंतर आघाडी पक्षात धास्ती भरली आहे.
२00९ च्या परिसिमनानुसार अर्जुनी/मोरगाव तालुका लाखांदूर विधानसभेतून बाहेर पडून अर्जुनी/मोरगाव, सडक/अर्जुनी व गोरेगाव तालुक्यातील मोहाडी मंडळ क्षेत्र मिळून अर्जुनी/मोरगाव विधानसभा क्षेत्राची निर्मिती झाली. तसे हे तालुका कुठल्याही एका राजकीय पक्षाचे बालेकिल्ले नाहीत. येथे संमिश्र प्रतिसाद मिळतो. हा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. परिसीमनानंतर २00९ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने काँग्रेसचा पराभव करत पहिल्यांदा खाते उघडले. अर्जुनी/मोरगाव तालुक्यावर तशी खा. नाना पटोले यांची पकड आहे.गत निवडणुकीत पटोले यांच्या प्रभावामुळे भाजपचे आ. राजकुमार बडोले निवडून आले. परंतु उपरोधिक भाषेत साडे चार वर्षाच्या कार्यकाळात हे क्षेत्र कुपोषित राहिले. नजीकच्या कंत्राटदारांना खूष करण्यासाठी चावड्या, सभा मंडप, रस्ते दुरूस्ती यापलीकडे विशेष अशी विकासकामे या मतदारसंघात झाली नाही. मोजके कंत्राटदार गब्बर झाले. आमदारांनी मतदारसंघातील काही गावे दत्तक घेतली. मात्र ती जशी साडेचार वर्षापूर्वी होती तशीच आजही आहेत. आमदार निधीचा पैसा दत्तक गावांच्या किती कामात आला. हा संशोधनाचा विषय आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान आमदारांचा विरोध बर्याच गावात दिसू न आला होता. भाजपच्या बर्याच कार्यकर्त्यांनाही त्यांची अँलर्जी आहे. या परिस्थितीचा लाभ घेण्यासाठी याच पक्षाचे अनेक कार्यकर्ते उमेदवारीसाठी सरसावले आहेत.
आघाडी पक्षाच्या युतीमध्ये ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आली आहे. भाजपचे खा. नाना पटोले यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केल्यानंतर या मतदारसंघात काँग्रेसला योग्य नेतृत्वतच लाभले नाही. काँग्रेसच्या बळकटीकरणासाठी या क्षेत्राची धुरा आ. गोपालदास अग्रवाल व आ. रामरतन राऊत यांचेकडे सोपविण्यात आली. मात्र सततच्या दुर्लक्षामुळे येथे काँग्रेस दुबळी झाली आहे. काही प्रमाणात याचा राष्ट्रवादी काँग्रेसने लाभ उचलला. दहा वर्षापूर्वी मतदार व कार्यकर्ते नसलेली राष्ट्रवादी येथे मजबूत झाली आहे. हे शल्य सच्या काँग्रेसजनात होते. अशा मतदारांनी लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या उमेदवाराला धडा शिकविला. काँग्रेसचा उमेदवार सुध्दा राष्ट्रवादीने माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल ठरवितात. हा येथील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारात सूर दिसून येतो. त्यादृष्टीने त्यांची मर्जी संपादन करण्यासाठी अनेकांनी लोकसभा निवडणुकीत पुढे-पुढे केली. काँग्रेसकडे इच्छुकांची लांबलचक यादी आहे. अ.जा.प्रवर्गात अनेक जातींचा समावेश होत असल्याने दलिता व्यतिरीक्त या प्रवर्गात समाविष्ट होणारे सुध्दा त्या दृष्टीने कामाला लागले आहेत.
महायुती व आघाडीनंतर बहुजन समाज पक्षाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. मतदारसंघातील काही गावांमध्ये बसपा कॅडरची गढ्ढा मते आहेत. दोन्ही राजकीय पक्षानंतर बसपाला तिसर्या क्रमांकाची मते मिळतात. दोन्ही प्रमुख राजकीय प.क्षाच्या उमेदवारांना शह देण्यासाठी बसपा उमेदवारांना घाम फोडू शकते. मात्र उमेदवार कसा असेल यावर अवलंबून आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे या मतदारसंघात तेवढे अस्तित्व नाही. त्यामुळे या पक्षाच्या उमदेवाराचा इतर उमेदवारावर परिणाम होईल असे चित्र आजघडीला तरी नाही. प्रत्येक राजकीय पक्षाकडे इच्छुक उमेदवारांची लांबलचक यादी आहे. उमेदवारी देतांना प्रचंड मनस्ताप होणार आहे.
अनेकांची मनधरणी सुध्दा करावी लागेल. एवढे असूनसुध्दा मोठय़ा प्रमाणावर बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या बंडखोरीचा नेमका कुठल्या उमेदवारावर परिणाम होईल यावरच निकाल अवलंबून असणार आहे.