अन् नाथजोग्यांची पोरं झाले बोर्डाची परीक्षा पास

By Admin | Updated: June 28, 2014 01:07 IST2014-06-28T01:07:14+5:302014-06-28T01:07:14+5:30

पिढ्यान्पिढ्या भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या समाजातील लोकांचे शिक्षण घेणे दूरच ते शिक्षणाचे नावही काढत नव्हते.

The students of Nathajos have passed board exams | अन् नाथजोग्यांची पोरं झाले बोर्डाची परीक्षा पास

अन् नाथजोग्यांची पोरं झाले बोर्डाची परीक्षा पास

नरेश रहिले गोंदिया
पिढ्यान्पिढ्या भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या समाजातील लोकांचे शिक्षण घेणे दूरच ते शिक्षणाचे नावही काढत नव्हते. मात्र त्यांच्यात शिक्षणासंदर्भात असलेला तिमीर दूर सारण्याचा प्रयत्न गोंदियातील एका समाजसेवकाने केला. त्यांनी आपल्या जीवनातील १० वर्ष या नाथजोगींच्या उत्थानासाठी लावले. परिणामी नाथजोगी समाजातील दोन मुलांनी नुकतीच बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण केली.
नाथजोगी समाजाची व्यथा समजणारे गोंदियातील सामाजिक कार्यकर्ता दुलीचंद बुध्दे हे शासकीय सेवेत असले तरी उपेक्षित समाजाच्या उत्थानासाठी ते सतत कार्य करीत असतात. गोंदिया जिल्ह्याच्या अदासी येथे १९९१ पासून वास्तव्यास असलेल्या या नाथजोग्यांची संख्या ७०० च्या घरात आहे.
परंतु भीक मागून उदरनिर्वाह करणे हा त्यांचा व्यवसाय होता. या नाथजोगी समाजातील एक १२ वर्षाचा मुलगा लक्षपती माळवे हा बुध्दे यांच्याघरी भीक मागायला आला. तो दिवस होता १७ आॅगस्ट २००४. बुध्दे यांनी त्या १२ वर्षाच्या मुलाच्या तोंडातून त्यांची परिस्थिती ऐकून ते त्यांच्या तांड्यावर गेले. त्यांच्या परिस्थितीची पाहणी केल्यावर विदारक चित्र त्यांना आढळले. या विदारक स्थिीतून त्यांना बाहेर काढण्याचा चंग बुध्दे यांनी बांधला. व मनुष्याचा सर्वांगिण विकास करणारा माध्य शिक्षण असल्याने त्या नाथजोगींच्या मुलांना शिक्षणाकडे वळविले.
त्यांनी गोंदिया जिल्ह्यातील शाळाबाह्य मुलांसाठी असलेला इंडस प्रकल्प या ठिकाणी तयार केला. त्या ठिकाणी या नाथजोगी समाजाच्या मुलांना शिक्षण देण्यात येऊ लागले. इंडस प्रकल्प बंद झाल्यावर त्यांना प्राथमिक शाळा अदासी येथे दाखल करण्यात आले.
अदासी येथील नाथजोग्यांची ७० मुले शिक्षणाच्या प्रवाहात आहेत. घरात खायला अन्न नाही तर शिक्षणाचा विचार करणेही दूर या मनस्थितीत असलेल्या नाथजोगींचे वारंवार समूपदेशन करून त्यांना आपल्या मुलाना शाळेत पाठविण्यासाठी बुध्दे यांनी प्रवृत्त केले. याचेच फळ म्हणून नाथजोग्यांची दोन मुले बोर्डाची परीक्षा पास झाले. बैद्यनाभ मन्साराम चव्हाण हा नुकताच १२ वीत ५२ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाला. तर एकनाथ मन्साराम चव्हाण हा नुकताच १० वीत ५० टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाला आहे.
शिक्षणासाठी बैद्यनाथला व एकनाथ या दोन्ही भावंडाना शिक्षणासाठी नूतन शिक्षण संस्था गोंदियाचे संचालक राजाभाऊ इंगळे यांनी दत्तक घेतले. ११ वी व १२ वी साठी लागणाऱ्या साहित्याचा पुरवठा केला. अन ते दोघेही भावंडे बोर्डाची परीक्षा पास झाले.
परंतु बैद्यनाथला आता पुढचे शिक्षण घेण्यासाठी कुणाचा आधार नसल्याने आपण पुढचे शिक्षण कसे करणार या विवंचनेत तो आहे.त्याचे आईवडील आजही भीक मागून उदरनिर्वाह करीत आहेत. घरात अठराविश्वे दारिद्र असताना पुढचे शिक्षण कसे घेणार ही चिंता बैद्यनाथच्या मनात आहे.
त्याच्या मदतीसाठी पुन्हा दुलीचंद बुध्दे यांनी शहरातील काही लोकांकडे धाव घेतली. परंतु त्यांच्या पुढच्या शिक्षणाची सोय अद्याप झाली नाही. समाजातील उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या त्यांच्या मदतीला समाजातील धनाढ्यांची साथ मिळाल्यास या समाजाचा उत्थान होऊ शकतो.
‘ते’ झाले त्यांचे उध्दारक
माझी नोकरी, माझे घर करणारे माणस स्वत:साठीच जगतात. परंतु दुसऱ्यासाठी जगणारे माणसे समाजात अत्यल्प असतात. याच अत्यल्प व्यक्तीतील एक माणूस म्हणजे दुलीचंद बुध्दे. त्यांनी मागील दहा वर्षापासून नाथजोगींच्या उत्थानासाठी कार्य करून त्यांच्या वस्तीत वीज, पाणी ची सोय करण्यासाठी प्रशासनाला भाग पाडले. त्यांना त्यांच्या जातीचे प्रमाणपत्र, रेशनकार्ड, रहिवासी प्रमाणपत्र मिळवून देण्यास ते यशस्वी राहीले. त्यांच्यासाठी निवास व्यवस्था यशवंतराव चव्हाण निवास योजनेंतर्गत त्यांच्यासाठी निवास मंजूर करण्यात आले. त्यांनू अनेक अधिकारी, पदाधिकारी यांना त्यांच्या वस्तीत नेऊन त्यांच्या समस्यांची माहिती दिली. परंतु भेट देणाऱ्या लोकप्रतिनधींनी फोटो काढल्या तर काहींनी प्रामाणिक प्रयत्न केले. त्यात वरिष्ट अधिकाऱ्यांचाही सहभाग आहे. ‘राजाने छळले, नवऱ्याने मारले आणि पावसाने झोडपले तर दाद मागयची कुणाकडे? हे बुध्दे यांचे नाथजोगी संदर्भातील वाक्य लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या समोर उपस्थित करीत असल्याने हे वाक्य भल्या-भल्यांना बुचकळ्यात पाडते. त्यावरच अनेक लोक त्यांच्या शब्दाला मान देऊन या नाथजोगींच्या तांड्यावर जातात. नाथजोगी समाजाचे उध्दारक बुध्देच असल्याचे नाथजोगी सांगतात. ‘गीरते को उठाना धर्म मेरा’ हे समजून बुध्दे कार्य करीत आहेत.

Web Title: The students of Nathajos have passed board exams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.