पत्रातून साधली विद्यार्थ्यांनी ‘मैत्री’
By Admin | Updated: March 18, 2015 01:00 IST2015-03-18T01:00:03+5:302015-03-18T01:00:03+5:30
ज्यांनी आपल्याला आनंद व ज्ञान दिले त्यांना धन्यवाद द्या, या प्रवीण दखनेंच्या विधानातून प्रेरणा घेऊन पलखेडा येथील...

पत्रातून साधली विद्यार्थ्यांनी ‘मैत्री’
नरेश रहिले गोंदिया
ज्यांनी आपल्याला आनंद व ज्ञान दिले त्यांना धन्यवाद द्या, या प्रवीण दखनेंच्या विधानातून प्रेरणा घेऊन पलखेडा येथील जि.प. शाळेच्या विद्यार्थ्यांनी मागील दोन वर्षांपासून ‘पत्रमैत्री’ उपक्रम शिक्षक युवराज माने यांच्या मार्गदर्शनात सुरू केला. या उपक्रमातून विद्यार्थ्याना वाचनाची आवड निर्माण व्हावी, विद्यार्थी लेखनास प्रवृत्त व्हावे व सामाजिक सुसंस्कार व्हावेत यासाठी पत्रमैत्री उपक्रम सुरू करण्यात आला.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना लेखक समजतो. मात्र प्रत्यक्ष लेखकच त्यांच्या भेटीला आले तर त्याचा आनंद काही औरच. असाच प्रत्यय या पत्रमैत्रीतून आला. लेखिका डॉ.संध्या पवार मुलांनी पाठविलेल्या पत्रामुळे भारावून गेल्या. त्या प्रत्यक्ष भेटण्यासाठी शाळेत आल्या. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज करून त्यांना भेटवस्तूही दिल्या.
बालभारतीचे सुहास परळे यांनी मुलांना पुस्तक भेट म्हणून २२०० रूपये शाळेला पाठविले. पुण्यातील लेखिका मेघाताई इनामदार यांनी १५०० रूपयांचा धनादेश पाठविला. या पैशातून विद्यार्थ्यांनी शाळेत वृक्षारोपण केले. मुलांनी पाठविलेले ग्रिटींग व लेखनाविषयी कळविले. विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रियांवर आनंदीत होऊन राजेंद्र कांबळे यांनी १००० रूपये व पुस्तक भेट दिले.
या शाळेतील विद्यार्थ्यांना आतापर्यंत प्रवीण दवने, डॉ.आ.क.साळुके, ‘किशोर’चे संपादक शिवाजी देशमुख, किरण केंद्रे, डॉ.संध्या पवार, डॉ.प्रतिमा विश्वास, आबा महाजन, इंद्रजीत भालेराव, एकनाथ आवाड, संजय सांगडे, सुहास बारटक्के या लेखकांचा पत्ररूपी आशीर्वाद मिळाला. या उपक्रमाचे शिक्षण विस्तार अधिकारी वाघमारे, मुख्याध्यापिका खोब्रागडे, केंद्रप्रमुख आर.आर. अगडे यांनी कौतुक केले.