विद्यार्थी उद्याचे भाग्यविधाते

By Admin | Updated: December 19, 2015 01:48 IST2015-12-19T01:48:42+5:302015-12-19T01:48:42+5:30

माणसाची खरी ओळख ही त्याच्या अंतरी असलेल्या गुणांमुळे होत असते. विद्यार्थ्यांत शिवाजी महाराज, रवंीद्रनाथ टागोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे महापुरूष लपले आहेत.

Students Feather Future | विद्यार्थी उद्याचे भाग्यविधाते

विद्यार्थी उद्याचे भाग्यविधाते

पी.जी. कटरे : पंचशील महाविद्यालयाचा रौप्य महोत्सव थाटात
सालेकसा : माणसाची खरी ओळख ही त्याच्या अंतरी असलेल्या गुणांमुळे होत असते. विद्यार्थ्यांत शिवाजी महाराज, रवंीद्रनाथ टागोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे महापुरूष लपले आहेत. कारण विद्यार्थी हेच उद्याचे भाग्यविधाते असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती पी.जी. कटरे यांनी केले.
तालुक्यातील ग्राम मक्काटोला येथील पंचशील हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवांतर्गत आयोजित पालक मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती देवराज वडगाये होते. प्रमुख पाहुणे म्हणून आचार्य सुधाकर चौधरी, पंचायत समिती सदस्य दिलीप वाघमारे, मेघराज हेमणे, बंडू चूटे, केशोदास शहारे, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष किसन चकोले, जयेंद्र अंबादे उपस्थित होते.
याप्रसंगी वडगाये यांनी, स्पर्धेच्या युगात ज्ञानी होऊन जिवनाचा शोध घेण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने धडपड करून आपले ध्येय गाठावे असे मत मांडले.
आपल्यातील कला ओळखून तिला आकार द्यावा
आपल्यातील कला ओळखून तिला आकार द्यावा आणि देशाचा चांगला नागरिक उभा करण्याची भूमिका शिक्षकांची असावी असे प्रतिपादन प्रबोधनकार बाबा नंदनपवार यांनी केले. माजी विद्यार्थी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
उद्घाटन प्राचार्य भवभूती महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीराम भुस्कुटे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून संस्था सचिव दिलीप मेश्राम, अ‍ॅड. प्रशांत तायडे, प्रा.डॉ. अमोल शामकुवर, डॉ. संजय देशमुख, रमेश चुटे, राहूल प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बी.बी.बिसेन व पंचशील महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.डी.मेश्राम, माजी विद्यार्थी चंद्रकुमार बहेकार, प्रकाश ब्राम्हणकर, किशोर रहांगडाले, रिना शहारे, सिने अभिनेत्री पायल कोटांगले, शुभम वालदे उपस्थित होते. याप्रसंगी शाळेच्यावतीने उपस्थित मान्यवर व निवडक माजी विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह, संविधान उद्देशिका व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उद्घाटक डॉ. भुस्कुटे यांनी, बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या आवडीनुसार शिक्षण देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. प्राचार्य मेश्राम यांनी, शासनाने शाळेसाठी खाजगी व शासकीय असा भेदाभेद करू नये, प्रलोभन नाहीतर प्रेरणा देणारे धोरण आखावे असे मत मांडले.
ग्रामीण विद्यार्थिनींत गगनभरारी घेण्याची क्षमता
ग्रामीण भागातही शिक्षणाचा प्रसार झालेला असून ग्रामीण मुलींनी जिद्द ठेवली व पालकांनी त्यांना सहकार्य केले तर मुलीसुध्दा गगनभरारी घेऊ शकतात असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी दिपाली खन्ना यांनी केले. त्या महाविद्यालयात आयोजित महिला मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या.
अध्यक्षस्थानी कवयित्री सपना बंसोड होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य उषा शहारे, कवयित्री अंजना खुणे, मक्काटोलाच्या सरपंच आशा खांडवाये, भजेपारच्या सरपंच प्रभा कलचार, आरोग्य सेविका एस.के. गोखले मक्काटोलाच्या उपसरपंच गीता शहारे उपस्थित होत्या.
महिलांवरील अन्याय दूर करण्यासाठी वाईट रुढी व अंधश्रध्दा दूर करणे आवश्यक आहे, असे आवाहन कवयित्री बंसोड यांनी केले. कवयित्री खुणे यांनी, आपल्या कवितांच्या माध्यमातून उपस्थित महिलांना संदेश दिला. प्रास्ताविक शिक्षिका एस.एम. उके यांनी मांडले. संचालन डी.एस. रोकडे यांनी केले. आभार पी.टी. भालेकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Web Title: Students Feather Future

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.