पथदिवे दिवसा सुरू व रात्रीला बंद
By Admin | Updated: December 21, 2014 23:01 IST2014-12-21T23:01:34+5:302014-12-21T23:01:34+5:30
मागील काही दिवसांपासून शहरातील पथदिवे दिवसा सुरू व रात्री बंद राहत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. यामुळे नगर परिषदेने आपल्या कार्यप्रणालीत तर बदल केला नाही? अशी चर्चा नागरिकांमध्ये

पथदिवे दिवसा सुरू व रात्रीला बंद
गोंदिया : मागील काही दिवसांपासून शहरातील पथदिवे दिवसा सुरू व रात्री बंद राहत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. यामुळे नगर परिषदेने आपल्या कार्यप्रणालीत तर बदल केला नाही? अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू असून या प्रकाराकडे नगर परिषद विद्युत विभागाचे व अधिकाऱ्यांचे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे.
शहरातील मुख्य मार्गांच्या दुतर्फा व वॉर्डांमध्ये नागरिकांच्या सोयीकरिता पथदिवे लावण्यात आले आहे. हे पथदिवे चालू व बंद करण्याची जबाबदारी नगर परिषद विद्युत विभागाची आहे. शिवाय नगर परिषदेने यासाठी एका खासगी कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. मात्र मागील १५ दिवसांपासून शहरातील पथदिवे सकाळी ११ वाजतापर्यंत सुरू असल्याचे दिसून येत आहे.
शहरातील काही भागात मात्र रात्रीच्या वेळेस मागील १५ दिवसांपासून पथदिवे बंद आहेत. यामुळे नागरिकांना अनेक गैरसोयींना सामोरे जाव लागत आहे. ही परिस्थिती आजची नाही तर यापूर्वी सुध्दा असा प्रकार अनेकदा घडला आहे.
दिवसा पथदिवे सुरू राहत असल्याने व रात्रीच्या वेळेस ते बंद ठेवण्यात येत असल्याने शहरात दिवसा उजेड आणि रात्री अंधार अशी स्थिती निर्माण झाली आहे. काही नागरिक तर नगर परिषदेने शहरातील पथदिवे रात्री बंद ठेऊन दिवसा सुरू ठेवण्याचा निर्णय तर घेतला नाही ना? असा सवाल करीत आहे. विशेष म्हणजे न.प.अतर्गंत येणाऱ्या वीज वितरण व्यवस्थेची देखभाल दुरूस्ती करण्याकरिता नगर परिषदेत स्वतंत्र विद्युत विभागाची स्थापना करुन अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मात्र मागील १५ दिवसांपासून शहरातील पथदिवे सकाळी ११ वाजतापर्यंत सुरू राहत असल्याने या विभागाचे कर्मचारी नेमके काय करीत आहेत. यावर देखील प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. तर मागील महिनाभरापूर्वीच वीज वितरण कंपनीने थकीत वीज देयकाअभावी न.प.अतर्गंत येणाऱ्या शहरातील पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडीत केला होता. दिवसाही पथदिवे सुरू राहत असल्याने अतिरिक्त वीज देयकाचा फटका देखील नगर परिषदेला बसत आहे. मात्र याकडे नगर परिषदेचे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे.
वीज वाचवाचा मंत्र दिला जात असताना नगर परिषदेकडून असला प्रकार केला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकारामुळे दिवसा उजेड रात्री अंधार असल्याचे चित्र गोंदिया शहरात पाहायला मिळत आहे. नगर परिषदेच्या बड्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शहरात दिवसालाही दिवे सुरू राहतात. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन असल्या प्रकारांवर आळा घालण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)