गोंदिया जिल्ह्यातील १३७ शाळाबाह्य विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 12:19 IST2018-10-13T12:14:12+5:302018-10-13T12:19:14+5:30
कुणीही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये, म्हणून शिक्षण विभागाने राज्यभर शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम राबविली. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात मोहिमेंतर्गत १३७ बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात आले.

गोंदिया जिल्ह्यातील १३७ शाळाबाह्य विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कुणीही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये, म्हणून शिक्षण विभागाने राज्यभर शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम राबविली. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात मोहिमेंतर्गत १३७ बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात आले.
शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना बालरक्षक म्हणून कार्य करण्याची संधी देण्यात आली आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळाबाह्य मुलांसाठी विशेष प्रशिक्षण देण्याची तरतूद केली आहे.शाळाबाह्य मुलांना जवळच्या नियमित शाळेत दाखल करुन त्यांचे यु-आयडी आधार काढण्यात यावेत. त्यांची उपस्थिती या माध्यमातून संनियंत्रित करण्यात यावी. या मुलांना वाचन-लेखन व गणितातील मुलभूत क्रिया अवगत होण्याकरिता महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाने विकसित केलेल्या शैक्षणिक कृती आराखड्याचाच उपयोग करण्यात यावा. यासाठी शिक्षकांनी स्वत:ला अधिक समृद्ध करावे,अश्या सूचना दिल्या आहे. विद्यार्थ्यांना सुलभ पध्दतीने ज्ञानार्जन करण्यासाठी दर्जेदार व गुणवत्तापुर्ण शिक्षण देणे, प्रत्येक शाळेला स्वच्छ व सुंदर परिसर उपलब्ध करून देणे,शाळेत लोकसहभाग वाढविण्यावर भर, शिक्षकांची गुणवत्ता व कल्पकतेला वाव, स्वअध्ययनावर भर, कठीण विषयाची आवड निर्माण करणे, शिक्षकांविषयी विद्यार्थ्यांच्या मनातील भिती दूर करणे, शाळा सुंदर, बोलक्या करणे, शाळेविषयी आवड निर्माण करणे, सोप्या पध्दतीने ज्ञानार्जन करून विद्यार्थ्यांच्या संपादणूक क्षमतेत वाढ करणे, सर्वांगिण विकास करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात १, आमगाव १० पैकी ५, गोंदिया १०७, गोरेगाव ३, सडक-अर्जुनी १० व तिरोडा ११ असे एकूण १३७ बालके शिक्षणाच्या मुख्यप्रवाहात आणले.
यशोगाथा एसएसए सौगन पोर्टलवर
शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणाशी संबंधित यशोगाथा, केस स्टडीज, व्हिडिओ आदी उल्लेखनीय बाबींचे मराठी व इंग्रजीमध्ये दस्तऐवज भारत सरकारच्या एसएसए सौगन या पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे.शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणासाठी योग्य पद्धतीने मूलनिहाय कृती कार्यक्रम आखून अपेक्षित अध्ययन संपादणूक पातळी साध्य करण्यासाठी स्थानिक प्राधिकरण स्तरावरुन काम झाल्यास १०० टक्के मुले शाळेत दाखल करुन गुणवत्तापूर्ण शिक्षण करण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यात येईल.