‘गोंदिया फेस्टिवल’मध्ये ‘सारस’ झाला दुय्यम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2017 00:09 IST2017-04-09T00:09:13+5:302017-04-09T00:09:13+5:30
अवघ्या राज्यात फक्त गोंदिया जिल्ह्यात आढळणाऱ्या सारस पक्षाबाबत माहिती व जनजागृती व्हावी यासाठी मागील ....

‘गोंदिया फेस्टिवल’मध्ये ‘सारस’ झाला दुय्यम
पर्यटनस्थळांवर फोकस : रोजगार व स्वयंरोजगार वाढविण्यावर भर
गोंदिया : अवघ्या राज्यात फक्त गोंदिया जिल्ह्यात आढळणाऱ्या सारस पक्षाबाबत माहिती व जनजागृती व्हावी यासाठी मागील वर्षी जिल्हा प्रशासनाने ‘सारस फेस्टीवल’चे आयोजन केले होते. या फेस्टीवलमध्ये सारसला घेऊन विविध कार्यक्रम व स्पर्धा घेण्यात आल्या. यंदा मात्र जिल्हा प्रशासनाने सारसांना फोकस न करता ‘सारस फेस्टीवल’ ऐवजी ‘गोंदिया फेस्टीवल’ घेऊन अवघ्या जिल्ह्यावरच लक्ष केंद्रित केले.
जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळांची ओळख होऊन रोजगार व स्वयंरोजगाराला चालना देण्याचा प्रयत्न गोंदिया फेस्टीवलमधून झाला. मात्र त्याचा गवगवा करण्यात प्रशासन कमी पडल्याचे दिसून येत आहे.
राज्यात फक्त गोंदिया जिल्ह्यात हा पक्षी आढळत असल्याने त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांचा मित्र असलेला हा पक्षी नदीकाठच्या शेतात जास्त प्रमाणात आढळतो. तर जिल्ह्यात गोंदिया, आमगाव तिरोडा या तीन तालुक्यांत या पक्ष्याचे वास्तव्य आहे. आपल्या जोडीदारासोबत आपला जीव देणारा हा दुर्मिळ पक्षी जपता यावा यासाठी गेल्यावर्षी तत्कालीन जिल्हाधिकारी विजय सुर्यवंशी यांनी ‘सारस फेस्टिवल’ चे आयोजन केले होते. पूर्णपणे सारस पक्ष्यावर लक्ष केंद्रीत करून आखण्यात आलेल्या या कार्यक्रमात विविध कार्यक्रम व स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते.
गतवर्षाच्या फेस्टिवलच्या माध्यमातून करण्यात आलेल्या जनजागृतीचे फलित म्हणजे जिल्ह्यात सारस पक्ष्यांची संख्याही वाढत आहे. मात्र वाढत असलेली ही संख्या अपेक्षेपेक्षा कमी आहे. गोंदियापेक्षा नजिकच्या मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात सारसांची संख्या वाढत आहे. या पक्ष्याला घेऊन पुन्हा एकदा सारस फेस्टीवलचे आयोजन अपेक्षित होते. यंदा मात्र जिल्हा प्रशासनाने ‘सारस फेस्टिवल’चे आयोजन न करता सारसला दुय्यम स्थान देत अवघ्या जिल्ह्यातील स्थळांवर लक्ष केंद्र करीत ‘गोंदिया फेस्टिवल’चे आयोजन केले आहे.
यंदाही विविध कार्यक्रम व स्पर्धा जिल्हा प्रशासनाने घेतल्या. यात गोंडी पेंटींग स्पर्धा, निसर्ग शिबिर, पक्ष्यांची माहिती व्हावी यासाठी शिक्षकांची कार्यशाळा, फोटोग्राफी कार्यशाळा घेण्यात आली. मात्र सारस या पक्षाच्या संवर्धनासाठी हवे होते ते प्रयत्न यंदा झाले नाही. अशाप्रकारे सारस वरील लक्ष भटकत राहिल्यास बोटावर मोजण्याएवढ्या संख्येत असलेला हा पक्षी भविष्यात दिसेनासा तर होणार नाही, अशी शंका व्यक्त होत आहे. जिल्ह्यात सारस पक्ष्याच्या संवर्धनासाठी आणखी प्रयत्न गरजेचे आहेत.
सारस जैवविविधतेचा सूचक
शेतकऱ्यांचा मित्र असलेला हा सारस पक्षी जैवविविधतेचा सूचक म्हणूनह ओळखला जातो. सारस पक्षी किटक खातो, त्यामुळे सारस जेथे असतो तेथे किटक, सरपटणारे प्राणी व वातावरण पोषक असल्याचे कळते. त्यामुळे सारस आढळल्यास त्या परिसरातील वातावरण जैवविविधतेच्या दृष्टीने पोषक असल्याचे स्पष्ट होते. म्हणूनच सारस जैवविविधतेचा सूचक म्हणून ओळखला जातो.
सारस संवर्धनासाठी जनजागृतीची गरज
सारस हा वाचवायचा असल्यास त्याबाबत जनजागृती हेच मुख्य कार्य करण्याची गरज आहे. सारस शेतकऱ्याचा मित्र असतो व शेतातील कीटक खाऊन तो तेथेच अंडी देतो. अशात शेतकऱ्यांनी त्यांना मारू नये व त्याबाबत जनजागृती करून सारस संवर्धनात हातभार लावावा याची गरज आहे. शिवाय शेतात रासायनिक खतांचा वापर टाळून सारस संवर्धनात मदतीची गरज आहे. यासाठी जनजागृतीची तेवढीच गरजेची आहे.