गणेश मंडळांना चोरीचा वीजपुरवठा
By Admin | Updated: September 1, 2014 23:41 IST2014-09-01T23:41:19+5:302014-09-01T23:41:19+5:30
गोंदिया शहरासह जिल्ह्याभरातील अनेक गणेश मंडळांकडून खुलेआमपणे वीजचोरी करून विद्युत रोषणाई केली जात आहे. परंतू उघडपणे हा प्रकार सर्वत्र सुरू असताना महावितरणच्या अधिकाऱ्यांनी

गणेश मंडळांना चोरीचा वीजपुरवठा
महावितरणची डोळेझाक : थेट तारांवरून टाकले अनेकांनी आकडे
मनोज ताजने - गोंदिया
गोंदिया शहरासह जिल्ह्याभरातील अनेक गणेश मंडळांकडून खुलेआमपणे वीजचोरी करून विद्युत रोषणाई केली जात आहे. परंतू उघडपणे हा प्रकार सर्वत्र सुरू असताना महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मात्र चक्क डोळे झाकून घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळासाठी गोंदिया जिल्ह्यात वीज वितरण कंपनीने वीजचोरी करण्याची सूट तर दिलेली नाही, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकूण ८४७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यापैकी फक्त ३१ गणेशोत्सव मंडळांनीच अधिकृतरित्या तात्पुरता वीज पुरवठा महावितरणमार्फत घेतला आहे. या मंडळांना कंपनीकडून मीटरही पुरविण्यात आले आहे. परंतु ८०० पेक्षा जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कोणत्याही प्रकारे अधिकृतपणे वीज वितरण कंपनीकडे वीज पुरवठ्यासाठी अर्ज केलेले नाहीत. छोट्या मंडळांनी घरगुती कनेक्शनवरून वीज पुरवठा घेतला आहे. त्यांचा वीज वापरही मर्यादित असतो. परंतू मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाईसह मोठमोठे हॅलोजन लाईट लावणाऱ्या मोठ्या मंडळांकडून सर्रास वीज चोरी केली जात आहे.
काही मोठ्या मंडळांनी नाममात्र वीज कनेक्शन घेतले आहे. पण प्रत्यक्षात जास्तीत जास्त वीज वापर अवैधपणे वीजेच्या तारांवर आकडे टाकून घेतलेल्या थेट वीज पुरवठ्यातूनच सुरू असतो. विशेष म्हणजे दिवसाढवळ्या हा प्रकार सुरू आहे. आकडे टाकून वीज घेतल्याचे सर्वसामान्य लोकांना दररोज पहायला मिळत आहे. परंतू महावितरणच्या एकाही अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला हे कसे दिसले नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काही मंडळाच्या सदस्यांनी या सर्व प्रकाराला महावितरणच्या अधिकाऱ्यांचेच पाठबळ असून कारवाई न करण्यासाठी मंडळाकडून पैसे घेतले जात असल्याचीही कुजबूज सुरू आहे. महावितरणचे कनिष्ठ कर्मचारीच नाही तर वरिष्ठ अधिकारीही या बाबतीत फारसे गंभीर नाहीत. त्यामुळे त्यांच्या बाबतही शंका व्यक्त केली जात आहे.
तीन वर्षापासून गणेशोत्सव मंडळांवर महावितरणचे दामिनी पथक कारवाई करणार, अशा बातम्या झळकत होत्या. परंतू एकाही मंडळावर कारवाई केल्याचे उदाहरण जिल्ह्यात नाही. ज्या मंडळांनी वीज कनेक्शन घेतलेले नाही त्यांची तरी निदान तपासणी होणे अपेक्षित आहे. मात्र पोलीस सहकार्य करीत नाही, अनेक अडचणी असतात अशी कारणे सांगून महावितरणचे अधिकारी पळवाटा शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत.
आतापर्यंत किती वेळा अशा कारवाईसाठी पोलिसांचे सहकार्य मागितले, अशी विचारणा केली असता तशी वेळ आलीच नाही, असेही उत्तर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिले. गणेश मंडळांना नियमित वीज दरापेक्षा सवलतीच्या दरात वीज दिली जाते. पण त्याबाबत कोणतीही जनजागृती करण्यात आलेली नाही.