नक्षल्यांच्या दहशतीने एसटीनेही घेतली माघार
By Admin | Updated: July 29, 2014 23:53 IST2014-07-29T23:53:22+5:302014-07-29T23:53:22+5:30
नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गोंदिया जिल्ह्यात सोमवारपासून नक्षल सप्ताह सुरू झाला. त्यामुळे देवरी व सालेकसा तालुक्यांतील अतिसंवदेनशील भागात शेतीच्या कामांसह अनेक व्यवहार ठप्प पडले आहेत.

नक्षल्यांच्या दहशतीने एसटीनेही घेतली माघार
शहीद सप्ताह : गोंदिया आगाराच्या ३० तर साकोली आगाराच्या ११ फेऱ्या रद्द
ंगोंदिया : नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गोंदिया जिल्ह्यात सोमवारपासून नक्षल सप्ताह सुरू झाला. त्यामुळे देवरी व सालेकसा तालुक्यांतील अतिसंवदेनशील भागात शेतीच्या कामांसह अनेक व्यवहार ठप्प पडले आहेत. याशिवाय एसटी महामंडळानेही या सप्ताहाच धसका घेतला असून गोंदिया आगाराने ३० तर साकोली आगाराने ११ बसफेऱ्या रद्द केल्या आहेत.
नक्षल्यांचा शहीद सप्ताह २८ जुलै ते ३ आॅगस्टपर्यंत राहणार आहे. या सप्ताहात नक्षली कारवायांना गती येवून जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता अधिक असते. याशिवाय अतीसंवेदनशील भागात लोकही या सप्ताहात घराबाहेर पडण्याचे टाळतात. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाने खबरदारीचा उपाय म्हणून त्या भागात बसफेऱ्या रद्द केल्या आहेत.
दोन्ही आगारांच्या बसफेऱ्या गोंदिया जिल्ह्याच्या नक्षल प्रभावित क्षेत्रात जाणार नाहीत. रा.प.च्या गोंदिया आगाराने या नक्षल सप्ताहात आपल्या एकूण ३० फेऱ्या रद्द केल्याने १७९७.२ किमीचा प्रवास बसेस करू शकणार नाही. त्यातच साकोली आगाराच्या काही बसफेऱ्या गोंदिया जिल्ह्यातील नक्षल प्रभावित क्षेत्रात चालतात. त्यापैकी सहा फेऱ्या अर्धवटपणे तर पाच फेऱ्या पूर्णत: अशा एकूण ११ बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे साकोली आगाराच्या बसेस गोंदिया जिल्ह्याच्या नक्षल प्रभावित क्षेत्रातील आपला २२०० किमीचा प्रवास करू शकणार नसल्याचे साकोलीचे आगार व्यवस्थापक धोंडाणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
गोंदिया आगाराच्या जिल्ह्यातील एकूण १० मार्गांवरील एकूण ३० बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात सालेकसा ते चांदसूरजपर्यंतच्या फेऱ्या रद्द झाल्याने १११ किमीचा प्रवास रद्द, सालेकसा ते गल्लाटोलाच्या फेऱ्या रद्द झाल्याने ६६ किमीचा प्रवास रद्द, सालेकसा ते डोंगरगडच्या फेऱ्या रद्द झाल्याने ७१.१ किमीचा प्रवास रद्द, गोंदिया ते मलाजखंडच्या चार फेऱ्या रद्द झाल्याने ५३२ किमीचा प्रवास रद्द, बिजेपार ते डोमाटोलाच्या फेऱ्या रद्द झाल्याने ४८ किमीचार प्रवास रद्द, गोंदिया ते वंजारीच्या सहा फेऱ्या रद्द झाल्याने २४७ किमीचा प्रवास रद्द, गोंदिया ते खोलगडच्या सहा फेऱ्या रद्द झाल्याने २६० किमीचा प्रवास रद्द, सालेकसा ते नवाटोलाच्या आठ फेऱ्या रद्द झाल्याने २४४.८ किमीचा प्रवास रद्द, गोंदिया सालेकसा ते पिपरियाच्या सहा फेऱ्या रद्द झाल्याने १९९.२ किमीचा प्रवास रद्द तर फुक्कीमेटाच्या फेऱ्या रद्द झाल्याने १७.८ किमीचा प्रवास रद्द झाला. अशाप्रकारे गोंदिया आगाराच्या एकूण ३० फेऱ्या रद्द झाल्याने १७९७.२ किमीचा प्रवास बसेस करू शकणार नाही.
काही ठिकाणी पोलीस संरक्षण किंवा ठाण्यांची परवानगी घेऊनच बसेस पुढे नेल्या जात असल्याचे साकोलीचे आगार व्यवस्थापक धोंडाणे यांनी सांगितले. साकोली आगाराच्या रद्द करण्यात आलेल्या अर्धवट फेऱ्यांमध्ये चिचगड-ककोडी-चिचगड, चिचगड-मगरडोह, देवरी-नक्टी, चिचगड-महाला, नवेगावबांध-चिचगड व केशोरी-राजोली या बसफेऱ्यांचा समावेश आहे. यातील चिचगड-ककोडी व चिचगड मगरडोह येथील फेऱ्या पोलिसांनी परवानगी घेवूनच्या पुढे नेण्यात येत आहेत. याशिवाय साकोली आगाराच्या पूर्णत: रद्द करण्यात आलेल्या फेऱ्यांमध्ये साकोली-कुरखेडा, साकोली-रायपूर, साकोली-आलेवाडा-पद्मपूर, साकोली-चिचगड-कुणबीटोला व साकोली-देवरी-फुक्कीमेंढा या बसफेऱ्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)