कोहमारा येथे तलाठी कार्यालय सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:46 IST2021-02-05T07:46:26+5:302021-02-05T07:46:26+5:30
कचरापेट्यांकडे आहे दुर्लक्ष केशोरी : येथील ग्रामपंचायतस्तरावरुन राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा इतरत्र पडून राहू नये ...

कोहमारा येथे तलाठी कार्यालय सुरू करा
कचरापेट्यांकडे आहे दुर्लक्ष
केशोरी : येथील ग्रामपंचायतस्तरावरुन राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा इतरत्र पडून राहू नये यासाठी चौकाचौकात कचरापेटी बसविण्यात आल्या. मात्र या कचरापेट्यांची नियमित सफाई होत नसल्याने त्या कचऱ्याने तुडुंब भरल्या आहेत. यावरून ग्रामपंचायतचे स्वच्छतेकडे किती दुर्लक्ष आहे, हे दिसून येते.
शिपाई भरतीची वयोमर्यादा वाढवा
आमगाव : मागील दोन-तीन वर्षांपासून पोलीस शिपाई भरती प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो तरुण बेरोजगार आहेत. ते पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. महाराष्ट्राच्या बेरोजगार युवकांच्या दृष्टिकोनातून पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा ३३ वर्षावरून ३५ वर्षे करण्यात यावी, अशी मागणी बेरोजगार तरुणांनी केली आहे.
बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला
सालेकसा : सध्या बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला, अंगदुखी व ताप यासारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. शिवाय गावांमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, त्यामुळे बोगस डॉक्टरांची चांदी आहे.
मोकाट जनावरांमुळे वाहतुकीत अडथळा
तिरोडा : शहरातील रस्त्यावर मोकाट जनावरांचा ठिय्या राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. मात्र याकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे.
बाजारात वीजव्यवस्थेची मागणी
सडक अर्जुनी : येथील गावात आठवडी बाजार भरतो. गावात या रस्त्यावर रहदारी अधिकच असल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या रस्त्यावर रात्रीच्या वेळी अंधाराचा सामना करावा लागतो. हा रस्ता सौंदड, पिपरी, कोहमारा या रस्त्याला मार्गक्रम आहे. या रस्त्यावर नेहमी लोकांची वर्दळ असते. तसेच येथील वॉर्ड क्रमांक ३ मधील सर्व जनता याच मार्गावरून ये-जा करीत असतात.
तेंदूपत्त्याचे बोनस त्वरित द्या
इसापूर :: अर्जुनी-मोर तालुक्यातील ग्राम ईटखेडा येथील फळीवर सन २०१९ मध्ये तेंदूपत्ता नेणाऱ्या लोकांना बोनस अजूनपर्यंत न मिळाल्याने तो त्वरित देण्याची मागणी नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे.
कामगारांची योजना पूर्ववत सुरू करा
गोंदिया : कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबईअंतर्गत इमारत बांधकाम करणाऱ्या गरीब मजुरांना थेट पाच हजार रुपये देण्याची योजना पूर्ववत सुरू करण्याची मागणी कामगारांकडून होत आहे.
निराधारांचे अनुदान त्वरित द्या
शेंडा कोयलारी : परिसरातील निराधार लाभार्थ्यांच्या बँक खात्यात मागील तीन-चार महिन्यापासून खात्यात अनुदान जमा झाले नाही. यामुळे त्यांची आर्थिक कोंडी होत आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
केव्हा तयार होणार प्रमुख रस्ता
केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्याला जाण्यासाठी प्रमुख मार्ग केशोरी गावाच्या मध्यभागातून जात असल्याने हा रस्ता अत्यंत वर्दळीचा झाला असून धोक्याचा बनला आहे. हा रस्ता अरुंद आणि घरे रस्त्याच्या कडेला लागून असल्याने अनेकदा लहान-मोठे अपघात घडले आहेत. या रस्त्याला पर्याय म्हणून ६ बायपास रस्ता अजूनही तयार झाला नाही.
नियमबाह्य रस्ता बांधकामामुळे अपघाताच्या संख्येत वाढ
बिरसी फाटा : बारबरीक प्रोजेक्ट कंपनीच्या माध्यमातून गोंदिया-रामटेक या राज्य महामार्गाचे काम सुरू आहे. पण तिरोडा तालुक्यातील बिरसी ते तिरोडा या रस्त्याचे बांधकाम करताना शासनाने लागू केलेल्या अटी-शर्तींचे उल्लंघन केले जात आहे. चुकीच्या रस्ता बांधकामामुळे या मार्गावरील अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. संबंधित कंपनीने याकडे लक्ष देऊन सुधारणा करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा परिसरातील गावकऱ्यांनी दिला आहे. बारबरीक प्रोजेक्ट कंपनीच्या गोदिया-रामटेक या राज्यमार्गाचे काम तिरोडा तालुक्यातील बिरसी ते तिरोडा सुरू आहे. रस्ता बांधकाम करतानाही शासनाने ज्या अटी व शर्ती घालून दिल्या आहेत, त्याचे पालन केले जात नसल्याने बिरसी-तिरोडादरम्यान अपघातात वाढ झाली आहे.