बाराभाटी : मागील एक महिन्यापासून स्थानिक आदिवासी विविध सहकारी संस्थेची धान खरेदी बंद आहे. अजूनही शेतकऱ्यांकडून पूर्णपणे धानाची विक्री झाली नाही. अशात धान खरेदी केंद्र बंद झाल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. त्यामुळे बंद असलेले धान खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
हे केंद्र आदिवासी विकास महामंडळांतर्गत चालविण्यात येते. त्यामुळे हे केंद्र सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांनी आदिवासी विकास महामंडळाला निवेदन दिले; पण त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. परिणामी शेतकऱ्यांची समस्या कायम आहे. संस्थेमध्ये खरेदी केलेल्या धानाची महामंडळाने आतापर्यंत उचल केलेली नाही. त्यामुळे संस्थेला धान खरेदी करून धान साठविण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. महामंडळाकडून शेतकऱ्यांना हवा तेवढा बारदाना मिळाला नाही. संस्थेकडे बाहेर जागेत धान खरेदी करण्यासाठी ताडपत्री नाही, धानाचे पोते ठेवण्यासाठी सिमेंट ओटे नाहीत, संस्थेचा परिसर धानाच्या खरेदीने संपूर्ण भरलेला आहे. परिणामी धान खरेदीवर याचा परिणाम झाला आहे.
......
दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या खरेदी केलेल्या धानाची हुंडी काढून पैसे जमा करतो, बोनसही जमा होऊन जाईल. राईस मिलर्सचे आंदोलन मागे घेतल्यानंतर धानाची उचल केली जाईल.
एस. बी. वासनिक, उपव्यवस्थापक तथा लेखापाल,
आदिवासी महामंडळ कार्यालय, नवेगावबांध.
---------------
आम्ही धान खरेदी सुरू करण्यासंबंधी निवेदन दिले, आमच्या काही समस्या आहेत त्या महामंडळाने पूर्ण करून खरेदी करण्यास परवानगी द्यावी.
- तुलाराम मारगाये, अध्यक्ष
आदिवासी विविध कार्यकारी संस्था, बाराभाटी.
-----------------