परिवहन महामंडळाला लक्ष्मीच पावली: १० दिवसांत ४.५३ कोटी गल्ल्यात
By कपिल केकत | Updated: December 4, 2023 20:19 IST2023-12-04T20:19:51+5:302023-12-04T20:19:51+5:30
दिवाळीत छप्परफाड; भाऊबीजनंतर उत्पन्नात वाढ

परिवहन महामंडळाला लक्ष्मीच पावली: १० दिवसांत ४.५३ कोटी गल्ल्यात
गोंदिया : प्रवासासाठी नागरिकांनी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस भरवसा दाखविल्याने दिवाळीत महामंडळाने यंदा छप्परफाड कमाई केली आहे. एकट्या भंडारा विभागानेच १० दिवसांत महामंडळाला चार कोटी ५३ लाख २७ हजार ६० रुपयांचे उत्पन्न आणून दिले आहे. विशेष म्हणजे, दिवाळीत प्रवासी संख्या वाढते यात शंका नाही; मात्र भाऊबीजनंतर खऱ्या अर्थाने महामंडळाची कमाई वाढल्याचे दिसून येत आहे.
‘कशाला करावी विषाची परीक्षा, एसटीच बरी खासगीपेक्षा’ राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसला घेऊन ही म्हण आहे. या म्हणीतून प्रवाशांना एसटीवरील विश्वास व्यक्त होताना दिसतो. कारण, महामंडळासाठी प्रवासी हेच खरी संपत्ती असून त्यांना जपून ठेवण्यासाठी महामंडळाकडून विविध योजना सुरू करीत आहे. महिलांना महिला दिनाची भेट म्हणून अर्धे तिकीट करताच बसमध्ये महिलाराज सुरू झाल्याचे दिसत आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांसाठीही अनेक योजना सुरू आहेत. हेच कारण आहे की, नागरिक आता प्रवासासाठी महामंडळाची एसटी पकडतात. यातूनच यंदा दिवाळीतील १० दिवसांत महामंडळाच्या बस भरभरून धावल्या व त्यातून कोट्यवधींचे उत्पन्नही महामंडळाच्या तिजोरीत आले.
भंडारा विभागातील ११ ते २० नोव्हेंबर या कालावधीची पाहणी केली असता विभागातील सहा आगारांनी एकूण चार कोटी ५३ लाख २७ हजार ६० रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. यामध्ये साकोली आगाराने या कालावधीत बम्पर एक कोटी सहा लाख ४४ हजार ३२२ रुपयांची कमाई केली आहे. त्यानंतर भंडारा आगाराने ९४ लाख ११ हजार ९४६ रुपयांची कमाई केली आहे.
परतीचा प्रवास ठरला लाभाचा
- दिवाळीत बहुतांश जण आपल्या घरी जातात. आपल्या कुटुंबीयांसोबत दिवाळी व भाऊबीज साजरी करून त्यानंतर सर्वांचा परतीचा प्रवास सुरू होतो. यंदाही येथेच परतीच्या प्रवासातूनच महामंडळाला सर्वाधिक उत्पन्न मिळाल्याचे दिसत आहे. १५ नोव्हेंबर रोजी भाऊबीज आटोपली असून, दुसऱ्याच दिवसापासून महामंडळाची कमाई वाढल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
१९ दिवसांतील उत्पन्नाचा तक्ता
११ नोव्हेंबर- ४१,३४,०२२
१२ नोव्हेबर- २८,५७,०८६
१३ नोव्हेंबर- २८,१९,४८८
१४ नोव्हेंबर- ३६,१०,४८९
१५ नोव्हेंबर- ४४,४२,०१५
१६ नोव्हेंबर - ५६,२७,०११
१७ नोव्हेंबर- ५६,२७,८४७
१८ नोव्हेंबर - ५७,१०,९४१
१९ नोव्हेंबर- ५७,१९,९२८
२० नोव्हेंबर- ४७,७८,२३३
आगारनिहाय उत्पन्नाचा तक्ता
आगार- उत्पन्न
भंडारा- ९४,११,९४६
गोंदिया- ७६,९४,४४३
साकोली- १,०६,४४,३२२
तिरोडा- ४७,७१,८१९
तुमसर- ९१,५५,२८२
पवनी- ३६,४९,२४८