सुरक्षा योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवा

By Admin | Updated: July 25, 2015 01:39 IST2015-07-25T01:39:07+5:302015-07-25T01:39:07+5:30

सामान्य जनतेचे हित लक्षात घेवून राज्यात प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजना व मुद्रा योजना ...

Spread the benefits of security schemes to the public | सुरक्षा योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवा

सुरक्षा योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवा

गोंदिया : सामान्य जनतेचे हित लक्षात घेवून राज्यात प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजना व मुद्रा योजना आदी सामाजिक सुरक्षेच्या विमा योजना राबविण्यात येत आहे. या विमा योजना जनतेचे सुरक्षा कवच असल्यामुळे याचा लाभ जिल्ह्यातील सामान्य जनतेपर्यंत पोहोचवा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात (दि.२१) आयोजित सुरक्षा योजनांबाबत जनजागृती मेळाव्याचे उद्घाटक म्हणून डॉ. सूर्यवंशी बोलत होते. अध्यक्षस्थानी गोंदिया येथील नाबार्डचे सहायक महाव्यवस्थापक मिलिंद कंगाली होते. प्रमुख अतिथी म्हणून नागपूर येथील सीडबीचे व्यवस्थापक सुंदरम्, भारतीय जीवन विमा निगम गोंदियाचे मुख्य व्यवस्थापक विवेक ठकार व जिल्हा अग्रणी प्रबंधक विवेक लखोटे उपस्थित होते.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना कंगाली म्हणाले, या सुरक्षा योजनांची गावागावात जाऊन जनजागृती करण्यात यावी. जास्तीत जास्त ग्रामस्थांना या सुरक्षा योजनांची माहिती व्हावी, यासाठी प्रयत्न करण्यात यावे. जीवन सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येकाने विमा काढलाच पाहिजे, असेही ते म्हणाले.
या वेळी एलआयसी गोंदिया शाखा व्यवस्थापक अतुल धामने यांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेची तर साळुंखे यांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेबाबत सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती विशद केली. पंतप्रधान मुद्रा योजनेबाबत साळुंखे, नॅशनल इन्सुरन्सबाबत भावना बिडीचंदाणी, ओरिएन्टल इन्शुरन्सबाबत डहाट, न्यू इंडिया इन्शुरन्सबाबत शेंडे व युनायटेड इंडिया इन्सुरन्सबाबत दवे यांनी विस्तृत माहिती दिली.
प्रास्ताविकातून अग्रणी जिल्हा प्रबंधक विवेक लखोटे यांनी सामाजिक सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना व पंतप्रधान मुद्रा योजनेबाबत विस्तृत माहिती दिली. योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले पाहिजे. त्यासाठी बँका सतत प्रयत्न करीत आहेत, असे त्यांनी सांगितले. संचालन सुरेश वासनिक यांनी तर आभार शिवाणी दुबे यांंनी मानले. कार्यक्रमास नागरिक, विमा प्रतिनिधी, बँकेचे अधिकारी, कर्मचारी, सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Spread the benefits of security schemes to the public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.